फॉरेन्सिक बॅलिस्टिक

फॉरेन्सिक बॅलिस्टिक

बॅलिस्टिकस हा शब्द बऱ्याचदा आपल्या कानावर पडतो. बॅलिस्टिक मिसाईल्स , बॅलिस्टिक एविडेंन्ससेस . बॅलिस्टिक म्हणजे नेमके काय? तर बॅलिस्टिकस म्हणजे प्रक्षेपण व बंदुकीतून झाडल्या जाताना गोळ्यांवर , केसिंगवर , बंदुकीच्या बॅरलवर होणाऱ्या परिणामांचा शास्त्रशुद्ध अभ्यास. या बॅलिस्टिक सायन्सचा गुन्हेतपासणीमध्ये फार महत्वाचा वाटा आहे. एखाद्या खून प्रकरणी जेव्हा केवळ बंदुकीच्या गोळ्या अथवा त्यांची केसिंग्स एवढ्याच पुराव्यांवरून गुन्हेगारापर्यंत पोहोचायची वेळ येते तेव्हा या छोट्या गोळ्याहि खूप काही सांगून जातात. 

सर्वप्रथम कॅल्व्हिन गोदार्द (१८९१-१९५५) या एका आर्मी ऑफिसरने या फॉरेन्सिक बॅलिस्टिक्सचे तंत्र विकसित केले. गोदार्द याना फॉरेन्सिक बॅलिस्टिकचे जनक मानले जाते . १९२९ मध्ये 'सेंट वॅलेंटिन्स डे हत्या' प्रकरणी बंदुकीच्या गोळीचे केसिंग तपासून दाखवून दिले कि वापरल्या गेलेल्या बंदुका ह्या पोलिसांच्या नव्हत्या व हे प्रकरण एक ' मॉब हिट ' होते. १९२५ मध्ये त्यांनी 'फॉरेन्सिक बॅलिस्टिक' ह्या आपल्या लेखामध्ये 'कंपॅरिसन मायक्रोस्कोप ' चा वापर कसा करावा ते सांगितले होते.

 

एप्रिल १९२५ मध्ये गोदार्द यांनी न्यूयॉर्क शहरात ' ब्युरो ऑफ फॉरेन्सिक बॅलिस्टिक' ची स्थापना केली. ह्या संस्थेची स्थापना संपूर्ण अमेरिकेत फायरआर्म्स आयडेंटिफिकेशन सर्विस पुरवण्यासाठी खास करून केली गेली होती. हि अमेरिकेतील पहिली प्रयोगशाळा होती जिथे बॅलिस्टिक, फिंगरप्रिंटिंग , ब्लड अनालिसिस , ट्रेस एव्हिडन्स ह्या सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी केल्या जाऊ शकत होत्या. 

  फिलिप ग्रॅव्हेल यांनी गोदार्दच्या मदतीने व त्यांच्या मार्गदर्शनाखाली 'कंपॅरिसन मायक्रोस्कोप तयार केला ज्यामुळे झाडली गेलेली बंदुकीची गोळी आणि तिचे केसिंग ह्यांचे आयडेंटिफिकेशन करणे शक्य झाले.

    आत्ताच्या आधुनिक काळात बॅलिस्टिक सायन्सने खूप प्रगती केली आहे. एखाद्या बंदुकीच्या गोळीवरून किंवा नुसत्या गोळीच्या इम्प्रेशनवरून बॅलिस्टिक एक्स्पर्ट काय काय सांगू शकतो? तर हे एक्स्पर्ट बंदुकीचा मेक, अचूक अंतर , गोळीचा अँगल , गोळी झाडली गेल्याची वेळ ह्या गोष्टी अचूक सांगू शकतात. जेव्हा गोळी बंदुकीच्या बॅरलमधून बाहेर पडते तेव्हा तिच्यावर बॅरल मधील ग्रूव्समुळे विशिष्ट मार्किंग्स तयार होतात. प्रत्येक वेगळ्या मेकच्या बंदुकांमध्ये हे मार्किंग्स युनिक असतात. त्यामुळे बॅरल मधील ग्रूव्हस आणि गोळीवरील मार्किंग्स परस्परांशी मॅच करून गुन्ह्यात वापरले गेलेले हत्यार नेमके ओळखता येते. 

   बंदुकीतून गोळी झाडली जाताना फक्त गोळीच बॅरल मधून बाहेर पडते असे नाही, तर त्याबरोबर गन पावडरचे कणसुद्धा त्यावेळी जवळच्या वस्तूंवर पसरतात. बॅलिस्टिक एक्सपर्टस ह्या गन पावडरच्या पॅटर्न्सवरून बंदूक आणि टार्गेट ह्यातील अंतरही ओळखू शकतात. व ह्यावरून झालेला मृत्यू हा खून आहे कि आत्महत्या हे सिद्ध करता येऊ शकते.

  १९६१, कोलंबिया, साऊथ कॅरोलिना, टॅक्सी ड्रॉयव्हर जॉन ऑर्नेरची डोक्यात गोळी मारून हत्या करून, मृतदेह कड्यावरून खाली टाकून दिलेला पोलिसांना सापडला. तपासणीत असे आढळले कि त्याचे खिसे उलट करून पहिले गेले होते. त्यावरून हा खून चोरीच्या उद्देशाने केला गेला होता असा निष्कर्ष पोलिसांनी काढला. तीन आठवड्यांनंतर टेनेसीमध्ये अठरा वर्षांच्या एडवर्ड फ्रेबर्गर नावाच्या सैन्यातून पळून गेलेल्या सैनिकाला अडवण्यात आले. त्याच्या कडे पॉईंट ३२ कॅलिबरचे लोडेड रिव्हॉल्व्हर सापडले जे त्याने साऊथ कॅरोलिना मधील पॉन शॉप मधून खुनाच्या आदल्या दिवशीच खरेदी केले होते. ऑर्नेरचा खून हा सुद्धा त्याच कॅलिबरच्या बंदुकीने झाला होता. फ्रेबर्गरला अटक करण्यात आली परंतु ठोस बॅलिस्टिक एव्हिडन्स अभावी त्याला सोडून देण्यात आले. पुढे हि केस कोल्ड केस म्हणून गेली. १९९७ मध्ये ती रिओपन केली गेली.ह्या केसाशी निगडित बरेच डिटेक्टिव्हस आता हयात नव्हते. ३९ वर्षांनंतर पुन्हा सगळे पुरावे तपासले गेले. एवढ्या काळात बॅलिस्टिक सायन्स मध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती झाली होती. प्रत्येक बंदूक हे गोळीवर एक विशिष्ठ छाप(फिंगरप्रिंट) सोडते. बॅलिस्टिक एक्सपर्टसनि ह्या फिंगरप्रिंट वरून शेवटी हे सिद्ध करून दिले कि फ्रेबर्गरच्याच बंदुकीतील गोळीनीच जॉन ऑर्नेरची हत्या झाली आहे. फ्रेबर्गरवर पुन्हा खटला चालवला गेला आणि त्याला दोषी ठरवले जाऊन जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली. फॉरेन्सिक बॅलिस्टिकच्या महत्वाच्या योगदानामुळे ४० वर्ष जुनी केस निकालात निघू शकली.