हा लेख वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

अदृश्य पुरावे

फोरेन्सिक सायन्स बद्दल मराठी मध्ये लेख

ट्रॅकिंग डाऊन टायर्स

By- Paresh Chitnis

   सुमारे एका शतकापूर्वीची गोष्ट घेतली तर गुन्हयाच्या ठिकाणापासून गुन्हेगार फारसा लांब जाऊ शकत नसे. विचार करा, गुन्हा करून एक-दोन तासाच्या आत,पायी किंवा जास्तीत जास्त घोड्यावर असा तो कितीसा लांब जाऊ शकणार? परंतु जेव्हा वाहने, गाड्या अस्तित्वात आल्या तेव्हा गुन्हेगारांचा पल्लाहि मोठ्या प्रमाणावर  वाढला. त्यांना फक्त दुसऱ्या शहरांमध्येच नाही तर  दुसऱ्या राज्यातही जाऊन गुन्हे करायचे उत्तम साधन मिळाल्यासारखे झाले. कारण गाडी हे एक असे साधन आहे कि गुन्हेगार गुन्हा करून राजरोसपणे तिथून गाडीत बसून कमीत कमी वेळात जास्तीत जास्त लांब निघून जाऊ शकतो. ते सुद्धा जास्त लोकांच्या नजरेत न येता.  आणि ह्याचा परिणाम म्हणूनच फॉरेन्सिक सायन्सला तपासासाठी एक नवीन शाखा विकसित करण्याची गरज निर्माण झाली. ती म्हणजे टायर ट्रॅक्स इन्वेस्टीगेशन. जशी बोटांच्या ठश्यांवरून माणसाची ओळख पटू शकते, तशीच चाकांच्या ठश्यांवरून गाडीची ओळख पटवता येऊ शकते. फिंगरप्रिंट्सप्रमाणेच प्रत्येक कंपनीच्या मेकच्या टायर्सचे स्वतःचे पॅटर्न्स असतात, व त्यावरून गुन्ह्यात  वापरली गेलेली गाडी आणि त्यावरून त्याच्या मालक-चालकापर्यंत पोचता येऊ शकते. बऱ्याचदा टायर मार्क्समध्ये व्हिक्टिमच्या रक्ताचे, गुन्ह्याच्या परिसरातील मातीचे अथवा रंग, केमिकल्स अश्या गोष्टींचे ट्रेसेस सापडतात ज्यावरून त्यांचा प्रत्यक्ष गुन्ह्याशी संबंध जोडता येऊ शकतो.

१९८६ साली अमेरिकेतील क्लॅमाथ काउंटी येथे घडलेली एक मर्डर केस अश्याच रीतीने टायर  मार्क्सच्या तपासातून   सोडवली गेली. कॅरी लव्ह नावाच्या तरुणीचा तिच्याच बॉसने क्रूरपणाने खून केला. आपले कृत्य लपवण्याचा हेतूने त्याने स्वतःचा ट्रक मृतदेहाच्या चेहऱ्यावरून चालवला जेणेकरून तिची ओळख पटणे शक्य होऊ नये. परंतु ह्या मध्ये ट्रकच्या टायरचे मार्क्स तिच्या छातीवर आणि हातांवर उमटले. फॉरेन्सिक इन्वेस्टीगेशन मध्ये टायर ट्रेड एक्स्पर्ट पिट मॅकडोनाल्ड यांनी त्या ट्रकच्या टायर्सचे प्लास्टर ऑफ पॅरिस मध्ये ठसे तयार केले व स्वतःच्या हातावर लाल डायमध्ये त्याचे ठसे उमटवून पाहून कॅरीच्या हातांवरील ठश्यांशी ते जुळवून पाहिले. अश्याप्रकारे ट्रकच्या मालकाचा हत्येशी थेट संबंध सिद्ध होऊन त्याला मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली गेली. टायर मार्क्सचा पुरावा ग्राह्य धरून गुन्हेगाराला मृत्युदंड दिला गेलेल्यापैकी हि एक दुर्मिळ केस होती.

स्किड मार्क्स : ज्यावेळी वेगवान गाडीला अचानक पूर्णपणे ब्रेक लावला जातो तेव्हा मोठ्या प्रमाणात उष्णता निर्मण होऊन टायरचे रबर काही प्रमाणात वितळून काळे मार्क्स रस्त्यावर उमटतात. त्याला स्किड मार्क्स असे म्हटले जाते. स्किड मार्क्सच्या तपासणीतून गाडीचा वेग, प्रवासाची दिशा, पॉईंट ऑफ इम्पॅक्ट इत्यादी गोष्टी ठरवता येतात.

  वेगवेगळ्या प्रकारच्या पृष्ठभागांवर चालवल्या गेलेली टायर्स टू किंवा थ्री-डायमेंशनल मार्क्स मागे ठेवतात. मऊ माती, चिखल, वाळू, कच्चे रस्ते, बर्फाळ रस्ते, गवताळ भाग ह्यांवर एकाच टायरचे वेगवेगळ्या प्रकारचे ठसे उमटू शकतात. अश्या मार्क्स वरून गाडीचे वजन, वेग, मॉडेल, दिशा, गाडी तिथून गेल्याला उलटून गेलेला वेळ, ड्रायव्हरची गाडी चालवण्याची पद्धत इतक्या गोष्टींची खोलवर तपासणी करणे शक्य होते. 

 

टायर मार्क्स कंपॅरिसन: प्रत्येक टायर उत्पादन कंपनीची टायर डिसाइन्स, मटेरियल, वेअर बार्स हे वेगवेगळे असतात. त्यामुळे गुन्हेतपासणीमध्ये गुन्ह्याच्या ठिकाणचे मार्क्स हे टायर उत्पादन कंपन्याच्या डिझाईन  डेटा बेसशी मॅच करून पहिले जातात. चाकांची झालेली झीजसुद्धा तपासली जाते. यातून हि गाडी कोणत्या प्रकारच्या परिसरात अथवा कामासाठी वापरण्यात आली आहे हे ओळखता येऊ शकते. साधारणतः वाहनांच्या चाकांचे ठसे कोरड्या कडक पृष्ठभागावर (डांबरी अथवा सिमेंटचे रस्ते) ठळकपणे दिसून येत नाहीत, पण ते तिथे नसतीलच असेहि नाही. कारण रस्त्यांवर गाडीची टायर्स कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या ओल्या, कोरड्या पदार्थांच्या संपर्कात येतातच. चिखल, मऊसर माती, पेंट्स, ग्रीस, रक्त, केमिकल्स असे कुठलेही पदार्थ टायरच्या संपर्कात आल्यानंतर जेव्हा ते कोरड्या पृष्ठभागावरून पास होते तेव्हा हमखास स्पष्ट ठळक ठसे मागे सोडतात. पण असे ठसे ओव्हर द पिरिअड अस्पष्ट व्हायला लागतात. त्यामुळे अश्या पुराव्यांचे फोटोग्राफ्स हे फार महत्वाचे ठरतात.   

चाकांच्या ठश्यांचा पुरावा हा "क्लास एव्हिडन्स" मानला जातो. ह्याचा अर्थ असा कि एखादा गुन्हा सिद्ध करण्यासाठी टायर मार्क्सच्या जोडीला इतर ठोस पुरावे सिद्ध होणे गरजेचे असते. कारण यातुन टायरचा प्रकार कळला तरी ते टायर एखाद्या विशिष्ठ गाडीचेच आहे हे त्यावरून सिद्ध होत नाही. परंतु ह्याच टायरवर जर मृताचे रक्त अथवा इतर ठळक अवशेष मिळाले असतील तरच ह्याला " इंडिविज्युअल एव्हिडन्स" म्हणून  न्यायालयात मान्यता मिळते. गुन्हेगार प्रत्यक्ष गुन्हा करताना काहीही पुरावा न ठेवता तिथून कितीही लांब निघून जाण्यात यशस्वी झाला तरी शेवटी त्याचेच वाहन त्याचा घात करून जाऊ शकते.

CPAG

Popular Posts