३० जानेवारी २०११ च्या रात्री सिने नटी लैला खान, तिची आई, मोठी बहीण, दोन भावंडे आणि चुलत बहीण असे सगळे अचानक नाहीसे झाले. परवेझ इकबाल टाक, लैला खानच्या आईचा तिसरा नवरा हा ह्या प्रकरणात संशयित होता. पोलीस तपासात त्याने गुन्हा काबुल करून, मृतदेहांची कशी विल्हेवाट लावली ते सांगितले. त्याच्या म्हणण्याप्रमाणे टाकने पूर्ण कुटुंबाला मारून लैलाच्या इगतपुरीच्या फार्म हाऊसमध्ये पुरून टाकले होते. उत्खननात पोलिसांना तिथे सहा मानवी सांगाडे, लोखंडी रॉड, चाकू आणि लैलाच्या अंगठ्या इत्यादी वस्तू सापडल्या. डी.एन.ए टेस्ट केल्यावर ते सापळे लैला आणि तिच्या परिवाराचेच असल्याचे निष्पन्न झाले.
गुन्हेगार आपले दुष्कृत्य लपवण्यासाठी पुरावे नष्ट करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतात. जास्त करून खून प्रकरणांमध्ये. त्यामुळे विशेषज्ञाना तपासणीसाठी पूर्ण मृतदेह मिळेलच असे नाही. बऱ्याचदा खुप वर्षांनंतर प्रकाशात आलेल्या खूनप्रकारणांमध्ये मृतदेहाचे केवळ अवशेष मिळतात. पूर्ण हाडांचा सापळा किंवा कधी कधी तर फक्त एखाद दुसरे हाड. अश्यावेळी मानववंशशास्त्रज्ञ(अँथ्रोपॉलिजिस्ट) आणि दंतवैद्यकशात्रज्ञ (ओडोन्टोलॉजिस्ट) ह्यांना अश्या केसेस सोपवल्या जातात. मिळालेली हाडे मानवी आहेत अथवा प्राण्याची? ती व्यक्ती मरून किती काळ उलटला आहे? त्या व्यक्तीचे वय, उंची, लिंग, वंश काय असेल? आणि मृत्यूचे कारण? ह्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची जबाबदारी त्यांना दिली जाते.
# पूर्ण सापळा समोर असताना तो मनुष्याचा आहे कि नाही हे समजणे अगदीच सोपे असते पण केवळ हाडांच्या काही तुकड्यांवरून हे ठरवणे अवघड होते. उदाहरणार्थ अस्वलाच्या पुढच्या पंजाची हाडे आणि माणसाच्या हाताच्या पंजाची हाडे अतिशय सारखी दिसतात. काही कासवांच्या पाठीचे तुकडे माणसांच्या कवटीच्या तुकड्यांसारखे दिसू शकतात. हरणे , मेंढ्या यांच्या बरगड्या मानवी बरगड्यांसारख्या दिसतात. लहान मुलांच्या हाडांची ओळख पटवणे तर अजूनच त्रासदायक असते कारण त्यांच्या हाडांची , कवटीची वाढ पूर्ण झालेली नसते. त्यामुळे ती एखाद्या लहान आकाराच्या प्राण्याशी सहज मेळ खाऊ शकतात. हाडांची ठेवण हि प्रत्येक प्राण्याच्या व माणसाच्या जातीच्या व शरीरातील त्यांच्या कार्यानुसार बनलेली असते. अँथ्रोपॉलिजिस्ट या विशेषांचा वापर त्या सजीवाची ओळख पटवण्यासाठी करतात.
# केवळ हाडांवरून व्यक्तीचे वय, लिंग, उंची एवढेच नव्हे तर त्याचा वंश ह्यांचाही अंदाज बांधता येतो. वयाच्या बाबतीत लहान मुलांची हाडांवरून ओळख पटवणे प्रौढ माणसांपेक्षा सोपे जाते कारण मुलांमध्ये हाडांची किती वाढ झालेली आहे ह्यावरून वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांचा अंदाज करता येणे शक्य असते. ह्यात प्रामुख्याने दात, कवटी, हात व पायांची लांब हाडे, पेल्वीस बोन, बरगड्या आणि हाडांची घनता ह्यांचा अभ्यास केला जातो. मृताच्या उंचीचा अंदाज करण्यासाठी हात व पायाच्या लांब हाडांचा जास्त उपयोग होतो. साधारणतः पूर्ण देहाची उंची हि आपल्या हाताच्या कोपर ते खांद्याच्या हाडाच्या लांबीच्या ५ पटींनी जास्त असते. हाडांच्या जाडीवरून माणसाच्या शरीरयष्ठीची कल्पना येऊ शकते. तसेच उजवा हात वापरणाऱ्या माणसांची उजव्या बाजूची हाडे जास्त करून जाड व मजबूत असतात व तोच प्रकार डावखोऱ्या माणसांच्या बाबतीत डाव्या बाजूच्या हाडांत आढळतो. लिंगभेदाच्या बाबतीत लहान मुलांपेक्षा प्रौढांच्या हाडांच्या ठेवणी वरून स्त्री व पुरुष हे ठरवणे सोपे असते. एकदा का शरीराची वाढ पूर्ण झाली कि लिंगानुरूप हाडांची ठेवण स्पष्ट होते. उदाहरणार्थ पुरुषांमध्ये पेल्वीस बोन हे फक्त हालचाल व आधारासाठी उपयोगात येते पण तेच स्त्रियांमध्ये बाळंतपणासाठी जास्त रुंद झालेले असते. मनुष्याच्या वंशानुसारही हाडांची ठेवण बदलते. तीन प्रमुख गटांत हि विभागणी केली जाते. १) कॉकेसॉइड २) निग्रॉइड ३) मोंगोलॉइड . नैसर्गिक ठेवणीनंतर तपासणी केली जाते ती हाडांना झालेल्या जुन्या व नव्या जखमांची. पूर्वी त्या व्यक्तीची हाडे जर फ्रॅक्चर झालेली असतील तर ती जुळताना त्यांवर विशिष्ठ खुणा राहिलेल्या असतात. तर अश्या वैद्यकीय अहवालांवरून पडताळणी केली जाते. मृत्यूसमयी चाकू अथवा गोळीने हाडांचे झालेले नुकसान,पूर्वी झालेल्या ओपेरेशन्सच्या खुणा, दातांची ठेवण , हाडे व दातांमधून घेतलेल्या डी.एन.ए. सॅम्पल्स वरूनही मृतांची ओळख पटवण्यात मदत मिळते.
# जेव्हा एखादा हाडांचा सांगाडा सापडतो तेव्हा त्यावरून त्या व्यक्तीचा मृत्यू कधी झाला असेल ते कळण्यासाठी हाडांच्या झालेल्या झिजेची तपासणी केली जाते. तसेच हाडांमधील नायट्रोजेन लेव्हल मोजणे, हाडांतील वेगवेगळ्या अमिनो ऍसिड्सचे अस्तीत्व ह्यावरून मृत्यूच्या वेळचा ढोबळ अंदाज बांधता येतो.
# काहीवेळा हाडांच्या अवशेषांवरून मृत्यूचे कारण समजून येऊ शकते. वेगवेगळ्या हत्यारांनी हाडे अनेक वेगवेगळ्या प्रकाराने तुटू शकतात. जसे कि जड वस्तूने मारल्याने तुटलेले हाड , चाकूने अथवा कुऱ्हाडीने कापले गेलेले हाड, बंदुकीच्या गोळीने हाडात झालेले छेद यांच्या पॅटर्न्स वरून मृत्यूचे कारण ठरविले जाऊ शकते.