हॉलिवूड थ्रिलर फिल्म्सचे वा क्राईम सिरीजचे चाहते असलेल्या लोकांनी अनेकदा 'जॉन डो/ जेन डो' ही नावे ऐकली असतील. कोण असतात ह्या नावांचे धनी? इंग्रजी भाषिक देशांमध्ये जेव्हा एखादा अज्ञात मृतदेह सापडतो, ज्याची सहजासहजी ओळख पटू शकत नाही अश्यावेळी जर तो देह पुरुषाचा असेल तर त्याला तपासणी दरम्यान 'जॉन डो' व स्त्रीचा असेल तर 'जेन डो' म्हणून संबोधले जाते. पोलिसांना सापडणाऱ्या प्रत्येक शवाजवळ प्रत्येक वेळी ओळखपत्रं सापडतीलच असे अजिबात होत नाही. अश्या अज्ञात कलेवरांची ओळख पटवण्यासाठी फॉरेन्सिक एक्सपर्ट्सना खूप मेहनत घ्यावी लागते. अँथ्रोपोलॉजिस्टस, डेंटिस्ट्स, फॉरेन्सिक आर्टिस्ट्स ह्या सगळ्यांची मदत घेऊन हे काम करावे लागते. बऱ्याचदा खूप काळापूर्वी मरण पावलेल्या व्यक्तीचे गाडले गेलेले किंवा बुडालेले शरीर अचानक सापडते. ते ओळखण्यापलीकडे कुजलेले असते. कधी कधी तर फक्त हाडे सापडतात. शरीर किती वाईट परिस्थितीत आहे ह्यावर ओळख पटवण्यासाठी लागण्याचा कालावधी अवलंबून असतो. ह्या प्रक्रियेला काही आठवडे, महिने किंवा काही वर्षेही लागू शकतात. काही दुर्दैवी कलेवरांची तर काहीच ओळख पटत नाही.
माणूस मेला की नैसर्गिक घटक आपले काम करू लागतात. शरीर आतून कुजायला लागते, तसेच बाहेरचे वातावरण, कीटक, प्राणी हे देखील ह्या प्रक्रियेला हातभार लावतात. पाण्यात वा आर्द्र वातावरणात शरीर पटकन कुजते, तेच बर्फात ते खूप दिवस तसेच्या तसे टिकते. उघड्यावर पडलेली प्रेतं प्राणी, कीटक ह्यांपासून वाचू शकत नाहीत. जर शरीर बऱ्यापैकी शाबूत असेल तर बोटांचे ठसे, डी.एन.ए., चेहरेपट्टी, कपडे किंवा विशिष्ठ टॅटूस यांवरून ओळख पटण्यास मदत मिळते. पण जेव्हा केवळ हाडांच्या अवशेषांवरून ओळख पटवण्याची वेळ येते तेव्हा सर्व तंत्रज्ञानाची मदत घ्यावी लागते. हाडांच्या ठेवणीवरून अँथ्रोपोलॉजिस्टस माणसाचे उंची, वय, लिंग, वंश ह्याचे निदान करू शकतात. हाडांना झालेल्या इजांवरून काही वेळा मृत्यूचे कारणही शोधात येऊ शकते. नुसत्या दातांवरूनसुद्धा बऱ्याच गोष्टी समजू शकतात. रोमन राजा क्लॉडीयसने आपल्या मारल्या गेलेल्या पत्नीचे दात तिची ओळख नक्की करण्यासाठी मागवल्याची कहाणी प्रसिद्ध आहे. तसेच प्रसिद्ध नॉर्मन राजा विल्यम द काँकरर हा स्वतःची ओळख म्हणून त्याने लिहिलेल्या पत्रांच्या सिलवर आपल्या वेड्यावाकड्या दातांचे ठसे उमटवत असे.
जेव्हा प्रेत चांगल्या अवस्थेत सापडते तेव्हा त्यावरील जन्मखुणा, जखमांचे जुने व्रण अथवा टॅटूस , काही वेळेस शरीरावरील दागिने त्या माणसाची ओळख पटवायला कामी येतात. काही टॅटू आर्टिस्ट्सच्या विशिष्ठ स्टाईल्स असतात, किंवा काही आर्टिस्ट्स विशिष्ठ प्रकारच्या इंक्स वापरतात. मृताच्या टॅटू केलेल्या त्वचेची तपासणी करून ह्या आर्टिस्ट्स पर्यंत पोचता आले तर तो ते ठराविक टॅटू करून घेतलेल्या माणसाची ओळख सांगू शकतो. १९३५ मध्ये सिडनी येथील समुद्रात दोन मच्छीमारानी एक मोठा शार्क पकडला. तो त्यांनी तिथल्या मत्स्यालयाला भेट दिला. पण खूप दिवस त्या शार्कने काहीच खाल्ले नाही आणि एक दिवस त्याने गिळलेला एक मानवी हात ओकून बाहेर काढला. बिचाऱ्या शार्कला पुढच्या तपासणी साठी स्वतःचा जीव गमवावा लागला. त्या हातावर दोन बॉक्सर्सचे टॅटू होते आणि तो हात शार्कच्या दाताने नाही तर चाकूने नीट कापला गेलेला दिसत होता. ह्या अर्थी तो एक खून होता. बऱ्याच मेहनती नंतर त्या हाताच्या फिंगरप्रिंट्स पोलिसांनि मिळवल्या आणि त्यावरून तो हात स्मिथ नावाच्या बॉक्सरचा असल्याचे समजले. स्मिथच्या पत्नीने हातावरचा टॅटू हा तिच्या पतीचाच असल्याचे ओळखले.
मृतदेहाच्या तपासणी मध्ये मेडिकल एक्सामिनरला शरीरावरील जुने जखमांचे व्रण किंवा शरीरात बसवलेले कृत्रिम भाग, व काही व्याधींमुळे शरीरावर झालेले परिणामांच्या खुणा कळून येतात. आपल्याला जेव्हा जखम होते तेव्हा ती भरून येताना ठराविक पद्धतीनेच भरते. ह्यावरून ती जखम होऊन किती काळ लोटलाय हे तपासनीस सांगू शकतो. तसेच कृत्रिम अवयव, हृदयातील पेस मेकर्स, व्हॉल्व्हस यांवर ठराविक ओळख क्रमांक कोरलेले असतात. त्या नंबर्स वरून हॉस्पिटल्स तो भाग कोणत्या व्यक्तीच्या शरीरात बसवला गेला होता ते अचूक सांगू शकतात.
आजच्या आधुनिक काळात कॉम्पुटरवर कवटीच्या मोजमापांवरुन 'फेस रिकन्स्ट्रकशन' सुद्धा शक्य आहे. जेव्हा नेहमीच्या वापरातल्या पद्धती फारश्या प्रभावी ठरत नाहीत तेव्हा मग ही पद्धत वापरली जाते. चेहऱ्याची पुनर्रचना करणारे आर्टिस्ट्स कवटीवरून कपाळाची रुंदी, डोळ्यांच्या खोबणीचा आकार, नाकाची ठेवण, जबड्याचा आकार ह्याचा अंदाज बांधून शक्यतो मूळ चेहऱ्याच्या जवळपास जाण्याचा प्रयत्न करतात. रेखाचित्र, शाडू मातीने बनवलेला चेहरा आणि कॉम्पुटरवर तयार केले गेलेले चेहऱ्याचे चित्र अश्या तीन पद्धती ह्यात वापरल्या जातात. ह्याचा मुख्य पाया मात्र त्या आर्टिस्ट्सची तर्कशक्ती आणि त्यांचे कौशल्य हा असतो.