२५ जानेवारी २०१२. एसटी चालक संतोष माने त्यादिवशी सकाळी पुण्यातील स्वारगेट डेपोतील एसटी बस ताब्यात घेऊन रस्त्यावर भरधाव वेगात निघाला. भर रस्त्यात बेफामपणे जाणाऱ्या त्या बसखाली ९ निष्पाप नागरिक चिरडले गेले आणि साधारण ३० जण जखमी झाले. हे प्रकरण शिवाजीनगर कोर्टात जवळ जवळ एक वर्ष चाललं. यात स्वतःच्या बचावासाठी मानेच्या वकिलाने हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला की तो एक मनोरुग्ण होता. घटना घडली त्यावेळी तो वेडाच्या भरात होता. त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव त्याला ह्या अतिहिंसक कृत्यासाठी जबाबदार धरले जाऊ नये. परंतु हाय कोर्टाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली. पुढे सुप्रीम कोर्टात त्याची फाशी रद्द होऊन जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली.
जवळपास प्रत्येक गुन्हेगार हा पकडला गेल्यावर स्वतःच्या बचावासाठी 'तो मी नव्हेच'चा पावित्रा घेतो. जर असे नसते तर पोलिसांचं काम फारच सोप्प झालं असत. गुन्हेगार खोट्या घटना बनवतो किंवा त्याला वाचवण्यासाठी वेगळाच निर्दोष माणूस गुन्ह्याची कबुली देऊन टाकतो. काही मोठ्या गुन्ह्यांमध्ये, जास्त करून खून प्रकरणांमध्ये हे खुनी कोर्टात स्वतःला वेडं वा मनोरुग्ण ठरवून घेऊन शिक्षेपासून वाचायचा प्रयत्न करतात आणि त्यात सफलही होतात. अश्या किचकट प्रकरणांमध्ये महत्वाची भूमिका ठरते ती मनोचिकित्सकाची. फॉरेन्सिक सायकियाट्रिस्टसचे काम गुन्हेगाराच्या खऱ्या-खोट्याची शहानिशा करणे हे असते. आरोपीच्या डोळ्यांच्या हालचाली, चेहऱ्यावरचे हावभाव, हातवारे, त्यांच्या बोलण्याचा सूर ह्या लहानलहान गोष्टींमधील बारकावे लक्षात घेऊन त्यांना निदान करावे लागते. एखादा खुनी उत्तम अभिनय करुन मनोचिकित्सकाच्याही डोळ्यात धूळ फेकू शकतो. अनुभवी पोलीस, मनोचिकित्सक हे अश्या नाटकी गुन्हेगारांच्या कहाण्यांच्या आरपार बघू शकतात व त्यांचे खोटे पकडू शकतात.
एकाधिक व्यक्तिमत्व विकार (मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर) हा एक असाच प्रकार. एक मनोविकार. १९७० मध्ये लॉस अँजेलिस येथे बलात्कार व खून यांची मालिका सुरु झाली होती. डोंगराळ भागात उघड्यावर मुलींचे मृतदेह टाकलेले सापडत होते. ह्यावरून त्या अज्ञात खुन्यांना 'हिलसाईड स्ट्रॅग्नलर्स' असे नाव दिले गेले. खूप काळानंतर मोठ्या मुश्किलीने अँजेलो आणि केनेथ या दोघांना अटक करण्यात आली. पण मानसशास्त्राचे शिक्षण घेतलेल्या केनेथने कोर्टात सांगितले की तो मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डरचा रुग्ण आहे आणि स्टिव्ह नावाचे त्याचे दुसरे व्यक्तिमत्व त्याच्या नकळत हे खून करून घेत आहे. केनेथचा अभिनय इतका उत्कृष्ठ होता की त्याने अनेक मनोचिकित्सकांना वेड्यात काढले. शेवटी डॉक्टर मार्टिन ऑर्न ह्या संमोहन शास्त्रातील विशेषज्ञानी त्याची तपासणी केली. त्यांनी संमोहनाखाली नेऊन स्टीव्हला बाहेर आणले. पण ह्या प्रकारात केनेथने खूप चुका केल्या. पहिली चूक म्हणजे स्टीव्ह हा स्वतःला 'मी' न म्हणता 'तो' असे संबोधू लागला. दुसरी चूक, जेव्हा ऑर्न यांनी केनेथला सांगितले कि ह्या विकारात केवळ एकच अन्य व्यक्तिमत्व असणे खूप विचित्र आहे, तेव्हा लगेचच 'बिली' नावाचा तिसरा व्यक्ती अस्तित्वात आला. ह्यावरून त्याच्या नाटकाचा शेवट झाला व त्याने शेवटी गुन्ह्याची कबुली दिली.
कोर्टामध्ये सुनावणीच्या वेळी अश्या खटल्यांमध्ये आरोपी आणि साक्षीदार ह्या दोघांचीही मानसिक स्थिती योग्य असेल तरच त्यांची विधाने ग्राह्य धरली जातात. ह्याची सुरुवात आरोपीची मानसिक स्थिती त्याच्यावरचे आरोप, त्याचे होणारे परिणाम आणि कोर्टाचे कामकाज समजून घेण्याइतकी स्थिर आहे कि नाही हे तपासून होते. जर आरोपी ह्या गोष्टी समजू शकत नसेल तर त्याच्यावर खटला चालवताच येत नाही. अश्यावेळी फॉरेन्सिक सायकियाट्रिस्टसना सदर आरोपीच्या मानसिक स्थितीबद्दल मत सांगण्यासाठी कोर्टात साक्ष देण्यासाठी बोलावले जाते. तसेच एखाद्या साक्षीदाराची साक्ष आरोपीचा वकील त्याला मनोरुग्ण ठरवून अवैध ठरवू शकतो. ह्यामुळेच मनोचिकित्सकाचा अनुभव अश्या साक्षीच्या वेळी खूप महत्वाचा ठरतो.