शव नसेल तर खून सिद्ध होत नाही. हा नियम १९५१ मध्ये न्यू झीलंड व १९५४ मध्ये यू.के. येथे मोडीत काढला गेला.
न्यू झीलंड मध्ये जॉर्ज कोरी याने त्याच्या दुसर्या लग्नाच्या एक आठवड्यात त्याच्या सासरच्यांना अशी बातमी दिली की समुद्रात नाव उलटल्याने त्याची नवविवाहित पत्नी बुडून मृत्यू पावली. तिचे शव मिळाले नाही. त्याने लगेच तिसरे लग्न केले. जॉर्जवर त्यावेळी ६५ गुन्हे दाखल होते त्यामुळे तो सराईत गुन्हेगार होता. कोर्टाने सर्व परिस्थिती पाहता त्याला फाशीची शिक्षा दिली, मात्र शव नसेल तर खून सिद्ध होत नाही हा नियम खून झाला तेव्हा अस्तित्वात असल्याने त्याची फाशीची शिक्षा टळली.
यू के मध्ये मायकल आणि सायकट नावाचे दोन पोलंडचे मित्र दुसर्या महायुद्धानंतर शेती करू लागले. सायकट अचानक दिसेनासा झाला. मायकल ने सांगितले की सायकट परत पोलंडला निघून गेला. पण त्याच्या किचन मध्ये हाडांचे तुकडे व रक्ताचे डाग दिसले. मायकलचा असा दावा होता की त्याने काही ससे शेतात मारले होते त्यांची ती हाडे व रक्त आहे. त्याकाळात डीएनए चाचणी नसल्याने जरी स्पष्टपणे सुद्ध करता येत नसले तरी परिस्थितीजन्य पुरावे पाहता यू.के.च्या कोर्टाने त्याला दोषी ठरविले.
अमेरिकेत पाहिल्यापासूनच असा नियम आहे की अचानक गायब झालेल्या व्यक्ति बाबत खुना व्यतिरिक्त कुठलीच शक्यता वाटत नसेल आणि तसे ठोस परिस्थितीजन्य पुरावे असतील तर शव नसेल तरीही खून झाला आहे असे मान्य केले जाऊ शकते.
ऑस्ट्रेलिया मध्ये १९८० मध्ये अझारीया चेंबरलेन नावाचे दोन महिन्याचे बाळ आई वडिलांबरोबर असताना एका टेंट मधून गायब झाले. आई लींडी हिचा असा दावा होता की एका डिंगो जातीच्या कुत्र्याने बाळाला पळवून नेले. ही केस प्रसिद्धी माध्यमांनी उचलून धरली. घटनास्थळाची पोलिसांनी केलेली पाहणी टीव्हीवर लाईव्ह दाखविण्यात आली होती. डिंगो कुत्र्याचे कोणतेही पुरावे न सापडल्याने बाळाच्या आईला जन्मठेपेची शिक्षा झाली. सहा वर्षांनंतर एका जंगली डिंगो कुत्र्यांच्या राहण्याच्या ठिकाणी त्या बाळाचे कपडे आढळून आले. २०१२ मध्ये म्हणजे घटनेच्या बत्तीस वर्षांनंतर कोर्टाने त्या मातेला निर्दोष करार दिला व चुकीच्या शिक्षेची दीड अब्ज डॉलर नुकसान भरपाई दिली. या डिंगो बेबी नावाने गाजलेल्या केसवर आधारित बरीच पुस्तके, चित्रपट व टीव्ही मालिका आल्या होत्या.
१९९० मध्ये अशीच एक वूडचीपर मर्डर नावाची केस गाजली होती. रिचर्ड क्राफ्ट हा पायलट होता त्याची पत्नी हेली क्राफ्ट ही एअर होस्टेस होती. हेलीला रिचर्डच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल समजले होते. तो खूप तापट स्वभावाचा होता. इतर एअर होस्टेस बरोबर त्याला हेलीने पाहिले होते. गुप्तहेर लावून तिने त्याच्याविरुद्ध पुरावे गोळा केले होते. एक दिवस अचानक हेली गायब झाली. आई कडे गेली आहे, बहिणी कडे गेली आहे असे सांगत रिचर्डने महिना रेटून नेला. सगळे विचारपूस करू लागले म्हणुन शेवटी पोलिसांना सूचित केले.
कोणतेही पुरावे हातात आले नाही. खून केला तर कुठे, कसा कळायला काही मार्ग नाही. हेलीने गायब होण्यापूर्वी आपल्या मित्रांना सांगितले होते की माझा जर अपघात झाला असे समजले तर तो अपघात समजू नका. त्यामुळे शंका होतीच की तिचा खून झाला आहे.
हेनरी ली हे गुन्हे अन्वेषण या क्षेत्रात जागतिक पातळीवर प्रसिद्ध नाव आहे. हेनरी ली तैवानच्या हेनरी सी ली इन्स्टिटय़ुट ऑफ़ फोरेन्सिक सायन्सचे संस्थापक व फोरेन्सिक शास्त्रज्ञ आहेत. त्यांना ही केस शोधायला दिली गेली.
रिचर्ड मुलांबरोबर बाहेर फिरायला गेला असता त्याच्या घराची झडती घेतली गेली. त्यात एका कार्पेटचा तुकडा सापडला व बिछान्यावर रक्ताचा डाग सापडला. घरकाम करणाऱ्या बाईने सांगितले की कार्पेट वर एक द्राक्षाच्या मापाचा डाग दिसला होता. नंतर कार्पेटचा तो कोपरा फाटलेला होता.
हेनरी ली यांनी रिचर्डचे क्रेडिट कार्ड डिटेल्स मिळवले. बायको गायब झाली त्याकाळात त्यात अश्या वस्तूंची खरेदीची नोंद सापडली ज्या वस्तू त्याच्या घरात नव्हत्याच. डीप फ्रीज, मोठे बेडशीट व ब्लँकेट. लाकडाचे बारीक तुकडे करायच्या मशीनचे एक दिवसाचे भाडे भरल्याची नोंद ही त्यात होती. तसेच क्रेडिट कार्डवर आॅटोमॅटिक लाकडं कापायची करवत त्याने विकत घेतली होती ती नंतर एका तलावात सापडली. त्या करवतीवर ओ पॉझिटिव्ह रक्त सापडले जे डीएनए चाचणीत हेली क्राफ्ट म्हणजे त्याच्या पत्नीचे असल्याचे निष्पन्न झाले.
हेनरी ली यांनी घटनाक्रम उलगडताना सांगितले की रिचर्डने बायकोला दोनदा डोक्यात मारले असावे. त्यानंतर तिचे शरीर डीप फ्रीज मध्ये ठेवून त्याने गोठवले. करवतीने तिचे छोटे तुकडे केले व लाकडं बारीक कापण्याच्या मशीन मध्ये ते घालून त्याचा भुगा केला व त्याची विल्हेवाट लावली. कदाचित तळ्यातल्या माश्यांना त्याने ते खायला घातले असावे.
अमेरिकेतली शव नसताना खूनाची शिक्षा देण्याचा हा पाहिलाच प्रसंग होता. पुरावे शोधण्याची हेनरी ली यांची खुबी अनेक केसेस मध्ये दिसून आली होती मात्र ही केस त्यांच्यासाठी देखील विशेष होती.
परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे दिला गेलेला न्यायनिवाडा हा खूप रोमांचक असतो. इतर कुठलीही शक्यता नसेल तरच शव सापडले नाही तरीही खूनाची शिक्षा दिली जाऊ शकते.