विविध प्रकारचे गुन्हे आपल्याला पाहायला किंवा ऐकायला मिळतात. गुन्हेगाराची मानसिकता वेगवेगळ्या प्रकारची असते. गुन्हा करण्यामागे त्यांची कारणे वेगळी असतात. एक प्रश्न नेहमीच मनात येतो की सगळ्या गुन्हेगारांमध्ये किमान समान मानसिकता काय असते? एखादी व्यक्ती गुन्हेगारी प्रवृत्तीची आहे का, हे कसे ठरवायचे?
मानसशास्त्रीय अभ्यासात काही व्यक्तिमत्त्व गुण असे सापडले आहेत की जे गुन्हा करणार्या व्यक्ति मध्ये सामान्यपणे मोठ्या प्रमाणात आढळतात.
तीन असे स्वभाव गुण आहेत की जे जास्त प्रमाणात एखाद्या व्यक्ति मध्ये असतील तर ती व्यक्ति गुन्हेगारी प्रवृत्तीची होऊ शकते. याला मानसशास्त्रीय भाषेत डार्क ट्रायेड असे म्हणतात. हे तीन स्वभाव गुण कोणते आहेत? या स्वभाव गुणांची नावं मजेशीर आहेत. त्याचा अर्थ आपण समजून घेऊ.
पहिला आहे नार्सीसीजम म्हणजे आत्मरतीवाद. मराठी अनुवाद ही इंग्रजी शब्दाइतकाच न उलगडणारा आहे. आत्मरतीवाद म्हणजे स्वतःच्या प्रेमात पडून आंधळा झालेला. स्वतःबद्दल खूप उच्च भावना असणे व त्याच बरोबर इतरांना तुच्छ लेखणे, पराकोटीचा अभिमान, गर्व व अहंकार असणे हे सर्व स्वभाव गुण आत्मरतीवाद म्हणुन ओळखले जातात.
नार्सीसीजम जास्त प्रमाणात असल्यास अशी लोकं स्वतःचं खरं करणे, असत्य बोलणे, उर्मटपणे वागणे असे करतात.
दुसरा आहे मायकेवॅलीयनीजम. मराठी मध्ये आपण धूर्त, कावेबाज किंवा पाताळयंत्री असे शब्द वापरू शकतो. हा स्वभाव असलेली लोकं फसवी असतात. नीतिमत्ता, सदाचरण, नैतिकता याचा अभाव असणारे.
मायकेवॅलीयनीजम जास्त प्रमाणात असल्यास अशी लोकं स्वतः कडे सत्ता किंवा अधिकार केंद्रित करून ठेवतात. अशी लोकं क्रूरपणे व्यवस्थापन करतात व अतिशय धूर्तपणे परिस्थिती हाताळतात.
तिसरा आहे सायकोपॅथी. समाज विरोधी स्वभाव, सहानुभूती व पश्चाताप यांचा अभाव, निर्भीडपणे व्यक्त करणे म्हणजे सायकोपॅथी. हे तीनही स्वभाव गुण जर एकाच व्यक्ति मध्ये असतील तर ती व्यक्ति गुन्हेगारी प्रवृत्तीची असण्याची शक्यता जास्त असते.
अशी लोकं गुन्हे करणे, समाजात तेढ निर्माण करणे, संस्थेत अडचणी निर्माण करणे असं करू शकतात. ही लोकं संघटनेत उच्च पदांवर असल्यास जास्त त्रासदायक ठरू शकतात.
गुन्हेगारांच्या मेंदू मध्ये काही साम्य असते का? आपल्या मेंदूचे दोन भाग असतात. मनुष्याच्या उत्क्रांती मध्ये मेंदूची रचना बदलत गेली. माकडाचा मेंदू आणि मनुष्याचा मेंदूचा काही भाग समान आहे कारण आपली उत्क्रांती माकडां पासून झाली. मेंदूच्या या जुन्या भागात काही पेशी असतात ज्यांना मिरर न्यूरॉन म्हणतात. समोरच्या व्यक्तिच्या भावना समजून घ्यायला या पेशी उपयोगी पडतात. एखादी कृती न करता ती कृती केली असता कसे वाटेल हे आपण अनुभवू शकतो ते या मिरर न्यूरॉन पेशींमुळे. दुसर्याच्या पायाला काटा टोचला तर तो काय अनुभवतोय हे आपण जाणवू शकतो. याला आपण सहानुभूती असे म्हणतो. दुसर्या व्यक्ति सह आपण त्याच्या परिस्थितीची अनुभुती घेतो ती सहानुभूती. डार्क ट्रायेड मधील तिसरा स्वभाव म्हणजे सायकोपॅथी जर जास्त असेल तर सहानुभूतीचा अभाव असतो. या व्यक्तींच्या मेंदूमध्ये मिरर न्यूरॉन पेशी कमी असतात. निर्दयीपणे गुन्हे करणार्या लोकांच्या मेंदू मध्ये मिरर न्यूरॉनचा पूर्ण अभाव असू शकतो.
डार्क ट्रायेड मधील हे स्वभाव आपल्या भवतालच्या लोकांमध्ये आहेत का ते तुम्ही आता शोधू शकतात. तसेच इतिहासातील हिटलर स्टॅलिन सारख्या व्यक्तींच्या बाबतीत हे किती खरं आहे ते ही पडताळून पाहू शकता. एका अभ्यासात असे लक्षात आले की रात्री जागरण करणे पसंत करणार्या लोकांमध्ये डार्क ट्रायेड स्वभाव गुण जास्त प्रमाणात असतात. सकाळी लवकर उठणाऱ्या लोकांमध्ये हे अवगुण कमी असतात.