मी खून केला नाही, माझ्या कडून खून झाला आहे पण तेव्हा मी झोपेत होतो. असल्या युक्तिवादाला क्वचितच कोणी खरं मानेल. केनेथ जेम्स पार्कस आपल्या सासू सासर्यांचा लाडका जावई होता. त्याला काही महिन्यांपासून जुगार खेळण्याची वाईट सवय लागली होती. तो रोज जुगार खेळायचा. जुगारात सगळे पैसे हरल्यानंतर त्याने कामाच्या ठिकाणी पैश्याची अफरातफर केली. त्याला नौकरीवरून काढून टाकण्यात आले. जुगाराचे व्सोसन सोडविण्यासाठी त्याने उपचार घेण्यास सुरुवात केली होती. तो दुसर्या दिवशी सकाळी आपल्या सासरी जाऊन हे सगळं सांगणार होता.
सकाळी तो झोपेतून उठला. त्याने गाडी काढली व सासरी गेला. तिथे जाऊन त्याने एक लोखंडी सळई घेऊन आपल्या सासूला मरेपर्यंत मारले. सार्याला मारायचा प्रयत्न केला पण तो वाचला.
नंतर तो सरळ पोलिस ठाण्यात गेला आणि त्याने सांगितले की मी कदाचित दोन व्यक्तींचा खून केला आहे.
कोर्टात त्याने सांगितले की तो खून करताना झोपेत होता. कोणत्याही कोर्टाने हे मान्य केले नसते.
एक टक्का खून प्रकरणातील आरोपी असे बोलतो. त्यातले अर्धे लोक झोपेत चालणे झोपेत हाणामारी करणे असे त्याआधी ही करणारे असतात. त्यांना तशी पार्श्वभुमी असते. अर्धे लोक कुठली ही निद्रा समस्या नसलेले असतात. या प्रकरणांमध्ये तज्ञ डॉक्टरांची मदत घ्यावी लागते. कारण बरेच लोक खोटं बोलत असतात. के जे पार्कसच्या बाबतीत तसे नव्हते. त्याच्या मेंदूचा ईईजी काढल्यावर असे लक्षात आले की त्याची झोप खूप विचित्र आहे.
आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपला मेंदू झोपेच्या वेगवेगळ्या पातळ्यांवर जात असतो. उथळ झोप, गाढ झोप अश्या अवस्था आपण अनुभवल्या असतीलच. या अवस्था मेंदूचा ईईजी काढल्यावर त्यात खूप स्पष्टपणे दिसून येतात. आर ई एम अवस्था खूप गाढ निद्रा अवस्था असते. या अवस्थेत आपल्या डोळ्यांचे बुबूळ सतत हलत असतात. या अवस्थेत स्वप्न दिसतात. झोपलेली व्यक्ति या अवस्थेत ९० मिनिटांपर्यंत राहू शकते. या अवस्थेतून हळू हळू उथळ निद्रा अवस्थेत येऊन मग मेंदू जागृत अवस्थेत येतो. थकवा ताणतणाव जास्त असल्यास आर ई एम निद्रा अवस्था कमी होते. अश्या परिस्थितीत व्यक्ति नॉन आर ई एम अवस्थे पर्यंतच जातो.
के जे पार्कसच्या झोपेत काढलेल्या ईईजी वरुन असे दिसले की त्याचा मेंदू एन आर ई एम अवस्थेतून थेट जागरूक अवस्थेत येण्याचा प्रयत्न करतोय. ते ही दहा पंधरा वेळा. हे एखाद्या पॅरासोमनियाक व्यक्तिसाठी देखील सामान्य नव्हते. पॅरासोमनियाक म्हणजे जे लोकं निद्रेचे अवस्थांतरण होत असताना त्यातून बाहेर पडतात आणि निद्रा आणि जागृत अवस्थेच्या मध्येच अडकून राहतात.
नॉन आर ई एम अवस्थेत शारीरिक हालचाल करणारे लोकं झोपेत चालतात, बोलतात ओरडतात पण क्वचितच हल्ला करतात. नॉन आर ई एम अवस्थेत काही लोकं जेव्हा शारीरिक हालचाल करतात तेव्हा क्वचितच ते आक्रमक होऊ शकतात. त्यांना या अवस्थेत त्यांनी काय केले ते लक्षात रहात नाही.
के जे पार्कस खूप तणावात होता. आर्थिक आणि सामाजिक अडचणीत तो होता. कदाचित त्यामुळे त्याची निद्रा सुरळीत नव्हती. १९९२ मध्ये कॅनडा सुप्रीम कोर्टाने त्याला खुनाच्या आरोपातून मुक्त केले.
१९९७ साली स्कॉट फालाटरने आपल्या पत्नी यारमिला हिला ४४ वेळा चाकूने भोसकले व मारून टाकले. त्यानंतर त्याने चाकू धुवून एका डब्यात नीट ठेवला. त्याचे कपडे व सॉक्स त्याने एका खड्ड्यात टाकले. त्याच्या मते तो झोपेत होता. तज्ञ डॉक्टरांच्या मते त्यानी केलेले कृत्य निद्रिस्त अवस्थेत करण्यासाठी बरेच क्लिष्ट होते. त्याने केलेले कृत्य झोपेत केले जाऊ शकत नाही. कोर्टाने त्याला मनुष्यवध केल्याबद्दल दोषी ठरविले.
अँटोनीयो नीटो याने २००१ मध्ये झोपेत घरात शिरलेल्या अॉस्ट्रीच पक्षांपासून आत्मसंरक्षण करण्यासाठी झोपेत हल्ला केला पण जेव्हा तो जागा झाला तेव्हा त्याला कळले की त्याने त्याची पत्नी आणि सासूला कुऱ्हाडीने मारून टाकले आहे आणि मुलगी व मुलाला जखमी केले आहे. मात्र त्याच्या मुलाने असे सांगितले की अँटोनीयो त्याला म्हणाला लाइट लावू नको तुझी आई झोपली आहे. यावरुन कोर्टाने असा निष्कर्ष काढला की तो झोपेत नसून जागाच होता. त्याला दहा वर्ष मानसोपचार व दीड लाख युरो नुकसानभरपाई अशी शिक्षा दिली.
निद्रा ही एक मानसिक शारीरिक अवस्था आहे. त्याचे संतुलन बिघडले तर व्यक्ति झोपेत काय करू शकतो याचा नेम नाही. न्यायालयात हे सिद्ध करणे बरेचदा कठीण होते.
निरोगी स्वास्थ्यासाठी निद्रेबद्दल जागरूक असणेही फार आवश्यक आहे.