सगळे युक्तिवाद ऐकून झाल्यावर न्यायाधीश पंचांची चर्चा झाली आणि थोड्याच वेळात कोर्ट पुन्हा गर्दीने भरून गेले. शुक्रावरच्या संध्याकाळी न्यू जर्सीत सहसा कोणी संध्याकाळी कोर्टात थांबत नाही. पण आज कोर्ट रूम भरलेले तरीही एकदम शांत होते.
न्यायाधीशांनी आरोपीला दोषी करार देत असे काही वाक्य बोलले जे ते कधी बोलत नाहीत. "तू एक पापी दृष्ट मानव आहेस. मी पुर्ण प्रयत्न करीन की तू तुरुंगातच मरशील आणि कधीही रस्त्यावर फिरू शकणार नाहीस."
लोकांचे खून करून त्यांच्या शरीराचे सारखे सात भाग करून ते स्वच्छ धुवून रक्त काढून टाकून पिशव्यांमध्ये भरून कचऱ्यात फेकणाऱ्या नराधमाला अजून काय म्हणणार?
रिचर्ड रॉजर्स अगदी शांत व सभ्य दिसणारा पण निर्दयी व क्रूर खुनी होता. या केसचा तपास फिंगरप्रिंटींगचा जगातला सगळ्यात महागडा तपास होता. सुपर ग्लू टेक्निक १९९० मध्ये प्रचलित होती पण त्यात फार काही निष्पन्न झाले नाही. शोधकर्त्यांनी वीएमडी नावाची नवीन टेक्निक वापरायचे ठरवले. वीएमडी म्हणजे वॅक्यूम मेटल डिपाॅझिट. यामध्ये अदृश्य बोटांच्या ठश्यांवर सोन्याचे कण डिपाॅझिट केले जातात आणि मग झिंक किंवा ज्याला जस्त धातू म्हणतात त्याचा थर दिला जातो, जेणेकरून बोटांचे ठसे स्पष्ट दिसतात आणि फिंगरप्रिंट मॅचिंग करणे शक्य होते. या प्रकरणांत प्लास्टिक पिशव्यांवर बोटांचे ठसे होते. प्रत्येक पुराव्यासाठी पाच ते दहा ग्राम सोने वापरावे लागत होते तेव्हा. साम्य असलेल्या अश्या पाच ते सहा केसेस मधील सगळ्या प्लास्टिक पिशव्यांची चाचणी करायची म्हणजे सोन्याचा धूर काढावा लागला असेल.
पुराव्यांचे जतन करणे किती महत्त्वाचे आहे यासाठी ही केस समजणे खूप महत्त्वाचे आहे. न्यू जर्सी मध्ये अश्या चार घटना घडल्या होत्या. घटनांमध्ये बरेच महिन्यांचे किंवा वर्षाचे अंतर होते. कोणत्याही तत्कालीन पद्धतीने बोटांचे ठसे मिळविणे शक्य नव्हते. पण ज्या प्लास्टिक पिशव्यांवर बोटांचे ठसे असण्याची शक्यता होती त्या नीट सांभाळून ठेवल्या गेल्या. १९९२ ९३ मध्ये घडलेल्या गुन्ह्याचा तपास २००३ मध्ये पुन्हा सुरू झाला आणि निकाल २००५ मध्ये लागला. दरम्यान अनेक डिटेक्टिवसने या पुराव्यांचा अभ्यास केला. अफिस नावाची एक कार्यप्रणाली असते ज्यात देशभरातील गुन्हेगारांचे बोटांचे ठसे सापडतात. आपल्याकडे असलेले बोटांचे ठसे संगणकात टाकताच ही कार्यप्रणाली ते ठसे कोणाशी मॅच होतात ते सांगते. ही अफिस कार्यप्रणाली तेव्हा नविन होती. संशयित रिचर्ड रॉजर्सचे ठसे त्यात सुरुवातीला नव्हते. त्यामुळे काही वर्ष तो सुटत राहिला. मात्र १९७३ मध्ये जरी तो एका प्रकरणात निर्दोष सुटला असला तरी संशयित आरोपी म्हणून त्याचे ठसे घेतले गेले होते. जुन्या फाईल्स चा डेटा जेव्हा अफिस कार्यप्रणालीत टाकला गेला तेव्हा त्याचे नाव तपासत सारखे येऊ लागले.
एका मरेरो खून प्रकरणात पिशव्यांवर दोन फिंगरप्रिंट आणी एक तळव्याचे प्रिंट तर दुसर्या अँडरसन खून प्रकरणात तब्बल अठरा फिंगरप्रिंट आणि एक तळव्याचे प्रिंट आरोपी च्या ठशांशी मॅच झाल्याचे कोर्टात सिद्ध झाले. आरोपी रिचर्ड रॉजर्स हा नर्सिंगचे काम करत असे. त्याने आपले गुन्हे मान्य केले नाही किंवा नाकारले ही नाही. तो शांत असायचा.
त्याच्या वकिलाने दोन युक्तिवाद केले होते. शरीराचे तुकडे जिथे सापडले तिथेच गुन्हा झाला असे म्हणता येत नाही आणि गुन्हा नेमका कुठे झाला याचे पुरावे नाहीत. खून नेमके कुठे केले गेले हे कधीच सापडले नाही. जिथे घटना घडली तिथे खटला चालवावा जिथे पुरावे सापडले तिथे खटला चालवणे योग्य नाही. त्यामुळे न्यू जर्सी कोर्टाच्या अखत्यारीत हे प्रकरण येते नाही.
दुसरा युक्तिवाद म्हणजे पिशव्यांवर बोटांचे ठसे सापडले याचा अर्थ आरोपीने पिशव्या हाताळल्या, खून केला असे नाही. त्या पिशव्यांवर इतर ठसे आरोपीचे नाहीत असे निष्पन्न झाले होते. त्यामुळे त्यानेच खून केले असे सिद्ध होत नाही असे त्यांनी सांगितले.
मात्र सर्व खुनांच्या दिवशी रिचर्ड कामावर आला नव्हता. १९७३ मध्ये त्याने आपल्या रूम पार्टनरला डोक्यात हातोडी मारून जीवे मारले होते. कोर्टात त्यावेळी त्याने स्व संरक्षणासाठी प्रति हल्ला केला असे सांगून निर्दोष सुटका करून घेतली होती. जरी दोनच प्रकरणांसाठी खटला चालवला गेला असला तरी न्यू जर्सीच्या बाहेर घडलेले अनेक अशाप्रकारचे खून त्यानेच केले होते. कामावर नसल्याचे पुरावे आणि फिंगरप्रिंट्स तिथेही मॅच होत होते. पण जुन्या केसेस पुन्हा उघडल्या गेल्या नाही.
रिचर्डला वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी ६५ वर्षांची जन्मठेप झाली. न्यायाधीश म्हणाले जर या गुन्ह्याची क्रूरता एक ते दहाच्या मापदंडात करायची झाली तर दहा मोजली जाईल.