लहान पणापासून गुन्हेगारी प्रवृत्ती असलेला स्टूयर बर्गवाॅल एका सशस्त्र चोरी मध्ये पकडला गेला.थॉमस क्विक या नावाने तो प्रसिद्ध होता. त्याच्या चौकशी दरम्यान भयंकर गोष्टी समोर आल्या. १९६४ ते १९९३ या काळात केलेले तब्बल तीस खून त्याने कबूल केले. हे खून स्वीडन, नाॅरवे, डेन्मार्क व फिनलँड या देशांमध्ये केल्याचे त्याने कबूल केले. न उलगडलेले काही खून स्टूयरने केल्याचे कबूल केल्यावर एकच खळबळ माजली. किती क्रूर व माथेफिरू आहे हा. त्याने ज्या गुन्ह्यांची कबुली दिली त्या पैकी काही केसेस १८ ते २५ वर्ष जुन्या होत्या. पंचवीस वर्षे जुनी प्रकरणे बंद करण्यात आली. न्याय व्यवस्था व पोलिस खूप सुखावले. मात्र काही लोकांना हे खटकले. एक व्यक्ति तीस गुन्हे कबूल करतो मात्र एकाही प्रकरणात ठोस पुरावे नाही. सगळे निकाल हे फक्त आणि फक्त गुन्हेगाराच्या कबुली वर आधारित होते. कारण प्रत्येक गुन्हा हा न सोडवता येणारा होता. कुठलेही पुरावे नाही की साक्षीदार नाही. बर्याच प्रकरणांमध्ये तर त्याने दिलेली माहिती विसंगत होती. स्टूयर बर्गवाॅल मनोरुग्ण असल्याचे सांगितले गेले. त्याला तसा उपचार ही सुरू करण्यात आला होता. जगातील सर्वात क्रूर गुन्हेगार सापडल्याचे काहींना थरारक व कौतुकास्पद वाटत होते तर काही लोकांना हे भयानक वाटत होते.
मात्र काही जणांच्या मनात पाल चुकचुकली. पोलिसांच्या हाती असा माणूस लागला आहे जो कुठलाही गुन्हा सांगा, कबूल करायला तयार आहे. या व्यक्तीच्या निमित्ताने पोलिसांना व तपास करणार्या यंत्रणांना जुन्या प्रकरणांच्या फाईल बंद करणे शक्य झाले होते. स्टूयर बर्गवाॅल कुठल्याही गुन्ह्याची कबुली देऊ लागला आहे असे काहींचे म्हणणे होते. पोलिस व मानसोपचार तज्ञ त्याला उपचार व चौकशी यात गुंतवून ठेवत होते.
काही वर्षांनी त्याने चक्क सगळे कबुली जबाब मागे घेतले. तीस पैकी आठ खूनाचे खटले त्याच्या विरुद्ध गेले. त्याला शिक्षा झाली. मात्र तीही नंतर मागे घेण्यात आली. कारण तो मनोरुग्ण होता आणि खोट बोलत होता.
हानेस रुस्तुम या टीव्ही पत्रकाराने त्याची मुलाखत घेतली त्यात त्याने हे सर्व गुन्हे केल्याचे नाकारले. २०१३ मध्ये त्याच्यावर असलेला शेवटचा आरोप ही मागे घेण्यात आला.
स्वीडन मधील ही खूप मोठी न्याय व्यवस्थेतील फसवणूक मानली गेली. काहीही पुरावे नसताना फक्त संशयिताच्या जबाबावर आधारित न्यायदान करणे किती संयुक्तीक आहे? पुढे तपास केला असता असे लक्षात आले की काही गुन्हे जे त्याने मान्य केले होते त्यात सापडलेले वीर्याचे नमुने त्याचे नव्हते. एका प्रकरणात त्याने सांगितलेल्या ठिकाणी पुरावे शोधले असता मिळालेले हाडांचे अवशेष हे खरंतर पुठ्ठ्याचे तुकडे होते. काही जबाब त्या प्रकरणांशी जुळत नव्हते. इस्राइल मध्ये केलेल्या एका खूनासाठी लाकडी काठीचा वापर केला होता, हे योग्य उत्तर देण्यापूर्वी त्याने कुर्हाड, कारचा जॅक, कुदळ अशी चुकीची उत्तरे देखील दिली होती.
अश्या परिस्थितीत फक्त प्रकरण मिटविण्यासाठी त्याची कबुली घेण्यात आली. त्याच्या उपचारादरम्यान त्याला दिलेल्या औषधांमुळे तो काहीही बोलत होता. त्याला विचारलेले सूचक प्रश्न योग्य नव्हते. त्याला चौकशी दरम्यान उत्तरे सुचवली जात होती, विशिष्ट हातवारे करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तो हवी तशी देत होता.
मानसशास्त्राप्रमाणे तो पॅथॉलॉजीकल लायर म्हणजेच अट्टल खोटारडा होता. ही एक मानसिक विकृती आहे. त्यात रुग्ण गोष्टी रंगवून सांगतो ज्या अगदी सत्य वाटतात. मनोरुग्णाचे आपण समजू शकतो पण अश्या तर्हेने पुरावे नसताना एका मनोरुग्णाचा गैरवापर करून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करणार्यांना काय म्हणता येईल?