फोरेन्सिक सायन्स किंवा न्याय सहाय्यक विज्ञान या क्षेत्रातील प्रगती मध्ये खूप मोठा वाटा रमण स्पेक्ट्रोस्कोपीचा आहे. रक्त, गन पॉवडर, कपड्याचे तंतू, लिखाणाची शाई, प्रिंटरची शाई, स्फोटके, ज्वलनशील पदार्थ, अमली पदार्थ, केस, धातू, रत्न, रासायने, अश्या कुठल्याही प्रकारच्या पुराव्यांचा अभ्यास करण्यासाठी रमण स्पेक्ट्रोस्कोपीचा उपयोग केला जातो.
रमण स्पेक्ट्रोस्कोपीचा शोध चंद्रशेखर वेंकट रमण यांनी लावला. एखाद्या पदार्थावर जेव्हा प्रकाश किरण पडतात तेव्हा त्यातील काही किरण सगळीकडे फेकले जातात (स्कॅटर होतात) . त्या किरणांची तरंगलांबी (वेवलेंग्थ) ही पडणार्या प्रकाश तरंगां इतकीच असते. पण काही लहरींची तरंगलांबी बदलते. या बदलाला रमण इफेक्ट असे म्हणतात. तपासामध्ये सापडलेला पुरावा नेमका काय आहे, किंवा सापडलेल्या पुराव्यात संशय असलेला पदार्थ आहे का? या प्रश्नांची उत्तरे रमण स्पेक्ट्रोस्कोपीच्या सहाय्याने मिळतात.
बॅंकेच्या चेकवर लिहिलेल्या मजकुरात काही बदल केले असतील तर ते रमण स्पेक्ट्रोस्कोपीने समजते. उदाहरणार्थ इंग्रजी संख्या एक ला चार करणे किंवा नऊ करणे सोपे आहे. पण हे करत असताना वापरलेला पेन वेगळा असेल तर शाई मधील फरक ओळखता येऊ शकतो. शाई ही अनेक रासायने वापरून तयार केली जाते. दोन उत्पादक सारख्याच रासायनांचा सारख्या प्रमाणात वापर करून शाई बनवले असे होत नाही. त्यामुळे प्रत्येक शाईचे गुणधर्म वेगळे असतात.
रक्ताचा डाग आहे किंवा इतर काही हे समजण्यासाठी रमण स्पेक्ट्रोस्कोपी वापरता येते. रक्ताने माखलेले कपडे पाण्याने धुतले तरी त्यात रक्ताचा अंश उरतो तो ही रमण स्पेक्ट्रोस्कोपीच्या आधारे समजतो. रक्त किती जुने आहे तेही समजते.
रमण स्पेक्ट्रोस्कोपीचे वैशिष्ठ्य असे की पुराव्याची कुठल्याही प्रकारे नासधूस होत नाही. याला नॉन डीस्ट्रक्टीव पध्दत असे म्हणतात. चाचणी करून झाल्यावर पुरावा इतर चाचणी साठी वापरता येतो. रासायनिक पद्धतीने चाचणी करण्यासाठी पुराव्याचा काही भाग वापरला जातो, ते या पद्धतीत टाळता येत. म्हणजेच खूप थोड्या प्रमाणात जरी पुरावा मिळाला असेल तरीही त्याचा अभ्यास करता येतो. रासायनिक पद्धतीने पेनची शाई तपासण्यासाठी मजकुराचा थोडा भाग वापरावा लागतो. शाई कुठल्यातरी रसायनात विरघळवून त्याची चाचणी करावी लागते. म्हणजेच पुराव्याचे डीस्ट्रक्शन होते. रमण स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये पुरावा चाचणीनंतर बदलत नाही. महत्त्वाचे कागदपत्र अभ्यासण्यासाठी आता तो कागद जपून ही त्याचा वापर केला जाऊ शकतो. पुरावे नष्ट न करता त्यांच्या चाचण्या करता येणं हे वरदान आहे असेच म्हणावे लागेल.
रमण स्पेक्ट्रोस्कोपी हे तपासणी करण्यासाठी वरदान समजले जाते कारण याचा उपयोग क्राइम सीन वर ताबडतोब केला जाऊ शकतो.
आंतरराष्ट्रीय विमानतळांवर संशयित वस्तू नेमकी काय आहे हे तपासण्यासाठी रमण स्पेक्ट्रोस्कोपी चा वापर केला जातो.
रमण स्पेक्ट्रोस्कोपी ही पदार्थाने शोषून घेतलेल्या तरंगांवर आधारित नसून परावर्तित किंवा न शोषून घेतलेल्या तरंगांवर आधारित असल्याने, चाचणीसाठी नमुना कसा असावा यावर काहीच बंधन नाही. स्थूल पदार्थ, तरल पदार्थ, पॉवडर, खडे अश्या कुठल्याही स्वरूपातील वस्तू चा अभ्यास केला जाऊ शकतो. नमुन्यात पाण्याचा अंश नको अशी काही गरज यात नाही. इतर चाचण्यांमध्ये तसे असते.
आज रमण स्पेक्ट्रोस्कोपीचे तपासणीसाठी लागणारे यंत्र खूप छोटे व कुठेही नेता येतील असे उपलब्ध आहेत. पोर्टेबल यंत्र उपलब्ध असल्याने तपास त्वरित होऊ शकतो. तसेच त्यासाठी शास्त्रज्ञ किंवा तंत्रज्ञान तज्ञ देखील आवश्यक नाही. बरेचदा या यंत्रांचा वापर करणार्या व्यक्तींना माहिती ही नसते की ते ज्या यंत्राचा वापर करीत आहेत त्यात रमण स्पेक्ट्रोस्कोपीच्या सिद्धांताचा वापर केला जातो आहे.
स्फोटक पदार्थ अंतरावरून ओळखण्यासाठी याचा उपयोग होतो. संशयास्पद वस्तू आढळल्यास तीत काही घातक रासायन आहे का, ज्वलनशील किंवा स्फोटक द्रव्ये आहेत का हे दुरून ओळखता आले तर तपासणी करणारे देखील सुरक्षित राहतात.
या तंत्रज्ञानाचा शोध भारतात लागला. भारतीय शास्त्रज्ञ भारतरत्न सी वी रमण यांना १९३० साली याबद्दल नोबेल पारितोषिक देण्यात आले होते. त्याकाळात कोणत्याही सोयी सुविधा नसताना स्व-खर्चाने स्पेक्ट्रोमीटर तयार करणारे रमण आजही भारतीय शास्त्रज्ञांसाठी प्रेरणादायी आहेत.