जवळ जवळ एक दशक ज्याचा शोध अमेरिकेची सीक्रेट सर्विस घेत होती तो सापडणार होता. काही मुलांना खेळताना बर्फामध्ये प्रिंटिंगची प्लेट व खोट्या नोटा सापडल्या होत्या. कोणताही खोट्या नोटा बनविणारा गुन्हेगार १०० डॉलर च्या खालच्या मूल्याची बनावट नोट बनवत नसे. मात्र हा कलाकार एक डॉलरच्या बनावट नोटा बनवित होता.
सुमारे दहा वर्षांपासुन या गुन्हेगाराचा शोध सुरू होता. सीक्रेट सर्विस एजंट शोध घेत एका बिल्डिंग पर्यंत पोहोचले. त्यांना गुन्हेगार प्रतिकार करेल असे वाटत होते. मात्र त्यांना एक ७३ वर्षांचा म्हातारा सापडला. त्याने मान्य केले की तो गेली नऊ दहा वर्षे एक डॉलर च्या खोट्या नोटा आपल्या किचन मध्ये छापत होता. एमेरिच ज्यूटनर नावाच्या या गुन्हेगारावर 'मिस्टर 880' नावाचा चित्रपट पुढे काढण्यात आला होता.
या बनावट नोटांचे वैशिष्ट्य हे होते की या जगातील सगळ्यात सुमार दर्जाच्या बनावट नोटा होत्या. त्यावरील जॉर्ज वॉशिंग्टनचे चित्र चुकलेले असायचे. वॉशिंग्टन चे स्पेलिंग देखील तो चुकवत असे. बर्याच ईतर चुका त्यात असायच्या.
ज्यूटनर एक दुकानात एकदाच बनावट नोटा वापरत असे. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या भागात या बनावट नोटा तो चालवत होता. आठवड्याला पंधरा डॉलर पेक्षा जास्त खोटय़ा नोटा तो चलनात आणत नसे. त्यामुळे त्याला पकडणे कठीण झाले होते. त्या काळातील ही बनावट नोटांची सगळ्यात खर्चिक शोध मोहीम होती. १९४८ मध्ये चलनात असलेल्या एक डॉलरच्या नोटां पैकी पाच टक्के नोटा बनावट होत्या. आणि हे सगळं हा भंगार गोळा करणारा वृद्ध ज्यूटनर एकट्याने करत होता.
२००२ मध्ये अमेरिकेच्या सीक्रेट सर्विसने ब्रिटन मध्ये काही बनावट शंभर डॉलर च्या नोटा बनविणाऱ्यांना अटक केली. हे बनावट डॉलर हुबेहूब यू एस डॉलर सारखे होते. आरोपींनी ३.५ कोटी मूल्याचे डॉलर अठरा महिन्यात छापल्याची कबुली दिली. हे डॉलर अमेरिकेच्या खर्या डॉलर सारखेच व काही वेळा त्यापेक्षा ही चांगले छापलेले असत. यांना सुपर डॉलर असे नाव पडले .
सुपर डॉलर हे कोण्या टोळी ने छापले असावेत असे होऊ शकत नाही. चलनी नोटां मध्ये बरेच सुरक्षा चिन्ह किंवा सिक्युरिटी फिचर्स असतात. चलनी नोटा या कागद नसून ते लीननचे पातळ कापड असते असे आपण म्हणू शकतो. नोट छापण्यासाठी ईंटॅग्लीयो शाई वापरली जाते. नोट यूव्ही लाइट मध्ये बघितल्यास त्यात निळे हिरवे तंतू आढळतात. नोटेमध्ये सिक्युरिटी थ्रेड असतो. सिक्युरिटी थ्रेड म्हणजे चांदीची एक तार जिच्यावर विशिष्ट शब्द कोरले असतात. ही चांदीची तार नोटेच्या दोन्ही बाजूला पृष्ठभागावर दिसते. वॉटरमार्क आणि नोटेवरील डिझाईन यात अनेक बारकावे असतात. या सगळ्याचा अभ्यास करून हुबेहूब बनावट नोटा बनविणे हे महाग व कठीण काम आहे.
अरब देशांमध्ये अमेरिकेचा डॉलर हा सर्वाधिक वापरला जातो त्यामुळे बनावट नोटांचा मोठा धक्का त्यांना बसू शकतो. या भीतीने अमेरिकेच्या नोटा अरब व्यावसायिक बॅंकेत तपासायला घेऊन येऊ लागले. जगात याबद्दल अफवांचे पेव फुटले होते. डॉलरची अर्थव्यवस्था कोलमडेल अशी भीती वाटू लागली. बँकेत आणलेल्या सुपर डॉलर नोटा बॅंकेला देखील ओळखता येत नव्हत्या. रशिया या देशाचा यात हात आहे अशी शंका सगळ्यांना होती. पण नंतर असा अंदाज बांधला गेला की उत्तर कोरिया या सुपर डॉलर च्या मागे आहे. दक्षिण कोरिया मधील गुप्तचर यंत्रणांना याची चाहूल लागली होती पण त्यांनी ते दुर्लक्षित केले कारण बनावट नोटा खूपच खऱ्या वाटत होत्या.
भारतात खोट्या नोटांचा सुळसुळाट झाल्याने नोट बंदीचा प्रयोग केला गेला. नुकतेच पश्चिम बंगाल मध्ये दोन हजाराच्या बनावट नोटा तपासात सापडल्या. गुरूग्राम, दिल्ली येथेही दोन हजार व पाचशेच्या बनावट नोटा घेऊन जात असताना दोघांना पोलिसांनी अटक केली.
बनावट नोटा विविध सिक्युरिटी फिचर्ससाठी तपासले जातात. यूव्ही लाइट, वॉटर मार्क, फ्लोरोसंट सिक्युरिटी मार्क्स, सिक्युरिटी थ्रेड इत्यादी बघून पुरावे शोधले जातात. बनावट नोटा खऱ्या म्हणून जाणीवपूर्वक चलनात आणणार्यावर किंवा बाळगणाऱ्यावर भारतीय दण्ड संहिता कलम ४८९ ब आणि ४८९ क प्रमाणे गुन्हा नोंदवला जाऊ शकतो.