थोडे थोडे पैसे साठवले तर कुठला ही त्रास न जाणवता मोठी रक्कम बाजूला पडू शकते. हे जसे पैशाचे नियोजन करण्यासाठी खरे आहे तितकेच गुन्हे करण्यासाठी पण खरे आहे.
एक खूप चर्चित घटना जिचा उल्लेख इंटरनेट वर बर्याच ठिकाणी आहे ती मी या लेखाच्या सुरुवातीला सांगतो. ही घटना काल्पनिक असावी असा माझा अंदाज आहे. कारण इंटरनेट वर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत.
एका झोझी (Zozy) नवाच्या व्यक्तीने आपल्या बॅंकेत जाऊन सांगितले की माझ्या खात्यात जमा झालेले अब्जावधी डॉलर्स हे माझे नाही आहेत. तरी ते कुठून आले ते आपण शोधावे.
बँकेने तपास केला असता त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. बॅंकेच्या बर्याच खात्यातून झोझीच्या खात्यात एक सेंट, म्हणजे डॉलरचा शंभरावा भाग, ट्रान्सफर झाले होते.
असे आधी झाले आहे का याचाही तपास केल्यानंतर असे निष्पन्न झाले की या पूर्वी झोक्सी (Zoxy) नवाच्या व्यक्तिच्या खात्यात असेच पैसे ट्रान्सफर झाले आहेत.
अनेक खात्यातून अगदी छोटी रक्कम हस्तांतरित करून मोठी रक्कम जमा करण्यात आली होती. हे करण्यासाठी बॅंकेच्या सॉफ्टवेअर मध्ये गडबड केली होती. महिन्यातील एका विशिष्ठ तारखेला अनेक खात्यातून अक्षरानुक्रमाने सर्वात शेवटच्या खात्यात एक सेंट हस्तांतरित होईल अशी व्यवस्था सॉफ्टवेअर प्रणालीत केली गेली होती. जोवर झोझीने (zozy) बॅंकेत खाते उघडले नव्हते तोवर झोक्सीचे (Zoxy) खाते नावाप्रमाणे सर्व खात्यात शेवटचे होते.
अश्या प्रकारच्या गुन्ह्याचा छडा लवकर लागत नाही कारण कोणीही इतकी छोटी तफावत लक्षात घेत नाही. आणि कुणाला लक्षात आले तरी एवढ्याश्या रकमेसाठी कोणी जाऊन बॅंकेला कळवण्याची तसदी घेत नाही.
'सलामी स्लायसिंग अटॅक' ही एक गुन्हा करण्याची पद्धत आहे. यात अगदी छोटी रक्कम खूप लोकांकडून चोरली जाते. कृती छोटीशी जरी असली तरी ती खूप वेळा केल्याने गुन्ह्याचा आवाका खूप मोठा असतो.
२००३ साली लॉस एंजल्स मध्ये पेट्रोल पंपावर एक इलेक्ट्रॉनिक चीप बसवून. बिलाच्या रकमेपेक्षा थोडी जास्त रक्कम क्रेडिट कार्ड वरुन घेऊन ४७०००० लोकांना फसवण्यात आले.
२००८ साली एका इसमाने ५८०००० बँक खाती उघडली. ऑनलाईन पेमेंट करण्यापूर्वी प्रत्येक खात्याच्या पडताळणीसाठी खात्यात डॉलरचा छोटा भाग रक्कम जमा करून खात्री केली जाते. मोठी रक्कम चुकीच्या खात्यात जाण्यापेक्षा अगदी छोटी रक्कम खात्यात जमा करून ती जमा झाल्याची खात्री करून मोठी रक्कम जमा केली जाते. या इसमाच्या या हजारो खात्यांमध्ये विविध कारणांसाठी खाते पडताळणीसाठी एक डॉलर पेक्षा छोट्या अनेक रकमा जमा झाल्या. असे लाखो डॉलर्स गोळा करणे गुन्हा नाही मात्र त्याने अनेक खोटे खाते उघडले हा गुन्हा ठरला. त्याला त्याची शिक्षा झाली. त्याने खाते उघडण्यास वापरलेली नावे, पत्ते व वापरलेली कागदपत्रे खोटी होती.
सलीम कारा नावाचा व्यक्ति तर या प्रकारच्या गुन्ह्यात माहीर होता. कारा हा स्वयंचलित रेल्वे तिकीट मशीन दुरुस्ती करण्याची नौकरी करत होता. सगळ्या मशीन तपासणे व त्याची काळजी घेणे हा त्याच्या नौकरी चा भाग होता. तो तेरा वर्ष या मशीन मधून नाणे चोरी करत असे. लोहचुंबक वापरून तो नाणी बाहेर काढत असे. एक एक नाणं काढता काढता त्याने तब्बल २.४ अब्ज डॉलर्स चोरले. तो नेहमी रात्रपाळीला काम करायचा आणि एकटा रहायचा. दर आठवड्याला तो बॅंकेत पाच ते सहा हजार डॉलर म्हणजे साधारण तेव्हाचे तीस-पस्तीस हजार रुपये किमतीची नाणी जमा करायचा. त्याने खूप मोठा राजवाड्यासारखा बंगला बांधला होता पण तो जुन्या खटारा गाडीत कामावर जायचा. त्याच्या शेजाऱ्यांना तो एक मेहनती कामगार वाटत असे. त्याने तेरा वर्षात चोरलेल्या २.४ अब्ज डॉलरचे एकूण वजन ३७ टन होते.
२००३ ते २०११ या काळात बागारोजो नवाच्या इसमाने असाच प्रकार पार्किंगच्या तिकीट मशीनवर केला. त्याला शिक्षा झाल्यानंतर त्या शहरातले पार्किंग तिकीट मधुन उत्पन्न पन्नास हजार डॉलरने वाढले.
थेंबे थेंबे तळे साचे ही म्हण या गुन्हेगारांनी खरी करून दाखवली. मात्र प्रत्येक वेळी काही ना काही पुरावे त्यांनी मागे सोडले व ते पकडले गेले.