आपण इंटरनेटवर जे शेअर करतोय ते आपल्या विरुद्ध पुरावा म्हणून वापरले जाऊ शकते. इतकेच नव्हे तर तुमच्या हातात आत्ताही असलेल्या मोबाईल मध्ये तुमच्या सर्व हालचालींची नोंद होत आहे. आजच्या लेखात मी अदृश्य डिजिटल पुराव्यांसंबंधित काही प्रकरणांबद्दल लिहीत आहे.
लॉकहीड या कंपनीसाठी काम करत असताना जॉन मॅकअफे याला अॅण्टी-व्हायरस ही संकल्पना सुचली. त्याने आपली कंपनी मॅकअफे असोसीएट्स १९८७ साली स्थापन केली आणि जगातील पहिले अॅण्टी-व्हायरस विकणे सुरू केले. मॅकअफे ची व्यक्तिगत संपत्ती २००७ मध्ये शंभर अब्ज डॉलर इतकी होती. मॅकअफे ड्रग्ज घेत असे. अनेक स्त्रियांशी त्याचे संबंध होते. त्याची ४७ मुले जगात आहेत असे त्याने एकदा लिहिले होते.
बेलिझ या देशात रहात असताना, त्याच्यावर बेकायदा ड्रग्जचे उत्पादन करणे व बेकायदा शस्त्र बाळगल्याचे आरोप होते. त्याच्या एका शेजाऱ्याच्या खून केल्याचा संशय त्याच्यावर होता. त्यामुळे तो भूमिगत झाला होता. ग्वातेमाले या देशात तो विना परवानगी लपला होता. बाहेरील जगाशी त्याचा संपर्क इंटरनेट वर सुरू होता.
त्याची मुलाखत घ्यायला दोन पत्रकारांस गुप्तरित्या त्याने आपल्या लपण्याच्या आलिशान ठिकाणी बोलावले होते. वाईस या ऑनलाईन नियतकालिकात रॉबर्ट किंग या पत्रकाराने "आम्ही आत्ता जॉन मॅकअफे सोबत आहोत" अश्या शिर्षकाची बातमी प्रसिद्ध केली व जॉन मॅकअफे बरोबरचा आपला एक फोटो ही प्रसिद्ध केला.
फोटो ही एक प्रकारची फाईल आहे. डिजिटल कॅमेरा मध्ये ती तयार होते तेव्हा प्रत्येक फोटो बरोबर त्या फोटोची माहिती ही त्या फाईल मध्ये स्टोर होते. या माहितीला मेटा डेटा असे म्हणतात. म्हणजेच माहितीबद्दल माहिती. फोटो कुठे व कधी काढला, कोणत्या कॅमेऱ्यातून काढला, लेन्स चा वापर केला होता का, फ्लॅश चा वापर केला होता का, इत्यादी माहिती ही त्या फोटो बरोबर सेव होते.
फोटो बद्दल या मेटा डेटाला एक्जिफ डेटा असे नाव प्रचलित आहे.
तर या पत्रकाराने जो जॉन मॅकअफे सोबतचा फोटो प्रसिद्ध केला त्याचा एक्जिफ डेटा ही प्रसिद्ध केला. त्या आधारे जियो-लोकेशन शोधून पोलिसांनी मॅकअफेला शोधून काढले व अटक केली.
सायबर फोरेन्सिक तज्ञ आज डिजिटल पुरावे शोधून गुन्ह्याचा छडा लावण्यात खूप मदत करतात कारण गुन्हेगार सतत उपकरणांचा व इंटरनेटचा वापर करत असतो व स्वतःच्या विरुद्ध पुरावे निर्माण करत असतो. गुन्ह्यात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या मोबाईल, कॉम्प्युटर व ईतर डिजिटल उपकरणांचा वापर होतो. बर्याच प्रकरणांमध्ये गुन्हा कसा घडवून आणावा किंवा पुरावे कसे नष्ट करावे या बद्दल गुन्हेगार इंटरनेट वर आधी माहिती शोधतो. इंटरनेट वर आपण कुठले शब्द माहिती शोधायला वापरले यावरून आपला त्यामागील हेतू काय होता हे स्पष्ट होऊ शकते.
२००६ साली एका स्त्रीच्या आत्महत्येचया प्रकरणात नवऱ्याने काही तासांपूर्वीच "झोपेच्या गोळ्यांचा ओवरडोस" असे गूगल वर शोधले होते हे तपासात स्पष्ट झाले. त्याला २०१० मध्ये दोषी ठरविण्यात आले व शिक्षा झाली.
एका विद्यार्थिनीचा अगदी नैसर्गिक गर्भपात झाला. आपण गर्भवती आहोत हेच तिला माहिती नव्हते. आंघोळीच्या टब मध्ये ती प्रसूत झाली व गर्भ मृत झाला असे दिसून आले. तिने त्यापूर्वी इंटरनेट वर काय वाचले होते याचा तपास करता असे लक्षात आले की तिने "घरच्या घरी गर्भपात"," घरच्या घरी नाळ कशी कापायची" हे शब्द वापरून माहिती शोधली होती.
पोहता न येणारी आपली बायको समुद्रकिनारी असताना भरतीच्या लाटेबरोबर वाहून गेली या दुःखात असलेल्या नवऱ्याने इंटरनेट वर हवामान खात्याच्या वेबसाईटवर स्थानिक भरती ओहोटीच्या अचूक वेळांची माहिती घटनेच्या दिवशी सकाळीच वाचली होती याचे पुरावे त्याच्या लॅपटॉप मधून मिळाले.
पॉल केगलीया याने फेसबुकचा मालक मार्क झुकेरबर्ग याला फेसबुकची स्थापना करायला २००४ साली हजार डॉलर दिले होते व मार्कने त्याला 'पेज बूक' म्हणजेच आत्ताची फेसबुक या कंपनीची पन्नास टक्के भागीदारी दिली होती असा दावा कोर्टात केला होता. त्याच्या परवानगीशिवाय त्याच्या घराची झडती घेऊन फेसबुकने डिजिटल पुरावे शोधले व सिद्ध केले की त्याने ईतर कामासाठी मार्कला ते पैसे दिले होते त्याने कोर्टात सादर केलेले पुरावे त्यानी स्वतः कॉम्प्युटरवर तयार केले होते.
आपण इंटरनेट वर जे काही करतो त्याने आपल्या डिजिटल पाऊलखुणा निर्माण होतात ज्या पुसल्या जात नाहीत. हे अदृश्य पुरावे डिजिटल फोरेन्सिकचे हात बळकट करतात.