कर्जाचे ओझे न पेलल्याने आत्महत्या करणाऱ्यांच्या बातम्या वाचून मन विच्छिन्न होतं. शेतकरी असो वा करोडपती, कर्जाने निर्माण झालेला ताण सहन न झाल्याने टोकाची भूमिका घेतात.
आज अदृश्य पुरावे या सदरात मी अश्याच एका घटने बद्दल लिहीत आहे.
लॉस एंजल्स, २२ जून २००९ रात्री एक वाजता डाॅक्टर काॅनरॅड मुरे याला त्याच्या पेशंटचा फोन आला. मला झोप लागत नाही तुम्ही त्वरित येऊन नेहमीचे औषध द्या. त्याचा हा पेशंट निद्रानाशाने त्रासलेला होता. मात्र त्याचे नेहमीचे
औषध देणे त्याच्या जिवाला धोकादायक होते.
वय वर्षे पन्नास. ४०० अब्ज डॉलरचे डोक्यावर देणे. प्रकृती खालावत चाललेली. जगाने यश व प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन ठेवलेले. अफवांचे वादळ वाहत होते. विख्यात पॉप गायक मायकल जॅक्सन, डोक्यावरून कर्ज उतरवून पैसा गोळा करून लहान मुलांसाठी दवाखाना उभारायचे स्वप्नं मानत घेऊन होता. 'धिस इस इट' नावाचा त्याच्या नव्या काॅन्सर्टचे लंडन मध्ये पुढील पन्नास शो हाऊस फूल झाले होते. पैसा पुन्हा येणार पण काॅन्सर्टची तयारी आता जोरात करावी लागेल. अनेक शारीरिक व्याधी, व्यसन या सगळ्यात मानसिक तणाव खूप वाढला होता.
डॉक्टर मुरे हा मायकल जॅक्सनचा १५००० डॉलर महिना अश्या मोठ्या पगाराचा डॉक्टर होता. प्रोपोफोल नावाचे भूल देण्याचे औषध तो मायकलला निद्रानाशासाठी देत असे. हे औषध फक्त डॉक्टर देऊ शकतात बाजारात ते सहज उपलब्ध नसते. डॉक्टर मुरेने इतर औषधे देऊन त्याला झोप येण्यासाठी प्रयत्न केले. मायकलला काही केल्या झोप येईना. 'मला माझं दूध दे' असं तो सारखं म्हणत होता. प्रोपोफोल औषध दूधा सारखे दिसते म्हणुन तो त्याला दूध म्हणत असे.
शेवटी सकाळी १०:४० वाजता डॉक्टरने त्याला २५ एमजी प्रोपोफोल इंजेक्शन दिले. मायकल क्षणात झोपला.
डॉक्टर थोडा वेळ बाथरूम मध्ये जाऊन परतला आणि पहिले तर मायकल तळमळत होता. दिलेल्या औषधाचा परिणाम उतरण्यासाठी त्याने दुसरे इंजेक्शन दिले. त्याचा काहीच उपयोग होताना दिसला नाही. सगळे प्रयत्न करून पाहिले, मायकलला दवाखान्यात नेण्यात आले. मात्र त्याने प्राण सोडले होते.
शवविच्छेदन केले असता त्याला अनेक व्याधी होत्या हे समजले. प्रोस्टेटच्या विकारामुळे लघवीला अडथळा, किडनी, लिवर पोटाचे विकार असल्याचे पुरावे दिसत होते. त्याच्या शरीरावर अनेक प्लास्टिक सर्जरीच्या खुणा होत्या. भुवया व पापण्यांवर टॅटू काढले होते. ओठ गुलाबी रंगाने टॅटू काढले होते. मणक्याचे विकार दिसून येत होते. खोट्या केसांचा टोप डोक्यावर चिकटवला होता. शरीरातील विविध अवयवातून घेतलेल्या रक्ताचे नमुने तपासले असता त्यात एफिड्रीन, मिडाझोलाम, लोराझेपाम, नाॅरडायाझेपाम, डायाझेपाम, लिडोकेन व प्रोपोफोल अशी विविध औषधे सापडली.
५० साक्षीदारांच्या साक्षी २२ दिवसांचा युक्तिवाद ऐकून सात न्यायमूर्तीनी जवळपास दोन दिवस चर्चा करून शेवटी डॉक्टर काॅनरॅड मुरे याला दोषी करार देऊन चार वर्षांची शिक्षा सुनावली. प्रोपोफोल हे मुळातच निद्रानाशाचे औषध नसून ते देताना त्याचा कुठलाही रेकॉर्ड ठेवला नाही. चुकीच्या औषधांचा वापर, हलगर्जीपणा, पैश्यासाठी चुकीचे प्रयोग केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला. रक्तात, हृदयात, किडनी व यकृता मध्ये आढळलेल्या अतिरिक्त प्रमाणातील औषधी रसायनांच्या आधारावर हा निकाल देण्यात आला.
मायकल जॅक्सनच्या मृत्यू नंतर त्याच्या संस्थेने जवळपास पूर्ण कर्ज फेडलं. व्यसन व तणावामुळे जगाने सर्वात मोठा शोमॅन गमावला.
