सीआयडी सारख्या मालिकांमध्ये सगळ्यात किळसवाणा सीन म्हणजे डेड बॉडी सापडल्यावर सगळे नाकाला रुमाल लावतात. हा सीन कल्पनेत जितका किळसवाणा वाटू शकतो त्यापेक्षा जास्त दुर्गंधीयुक्त व विद्रूप प्रत्यक्षात असतो. सापडलेल्या शवाचे कुजणे सुरु झाले असल्यास दुर्गंधी सुटते. अश्या परिस्थितीत मृत्यू झाल्यापासून शव सापडे पर्यंत किती वेळ होऊन गेला हे शोधणे कठीण होते. शरीरात अजून उष्णता असेल तर मृत्यू नुकताच झाला असावा असा अंदाज येतो. मात्र शरीराचे विघटन सुरू झाल्यानंतर असा अंदाज बांधता येत नाही.
अश्या वेळी एनटेमोलॉजी किंवा कीटकशास्त्र या विषयाच्या अभ्यासाची मदत होते.
मृत्युनंतर शरीरातील पेशींमध्ये पचन क्रिया करणारे ग्रंथी स्राव किंवा एंझाईम शरीराच्या पेशींचेच विघटन सुरू करतात.
पचन संस्थेत असलेले जिवाणू किंवा बॅक्टेरिया शरीरातील मऊ पेशींना खाण्यास सुरुवात करतात. यातून हायड्रोजन सल्फाईड, कार्बन डाय ऑक्साईड, मीथेन, अमोनिया सलफर डाय ऑक्साईड व हायड्रोजन सारखे वायू निर्माण होतात. दुर्गंधीचे मुख्य कारण हे वायू पदार्थ असतात. इतर जीवशास्त्रीय रासायने देखील उत्सर्जित होत असतात. या सगळ्यांच्या वासाने विशिष्ट किडे आकर्षित होतात. मृत शरीरावर माश्या बसू लागतात.
चकचकीत हिरव्या रंगाची, अंगावर केस असलेली माशी ही घरत दिसत नाही. मात्र मृत शरीराच्या वासाने या माश्या पंचवीस ते तीस मैलांवरुन देखील मृतदेहावर बसायला येतात.
मृत्यूनंतर पाहिल्या चोवीस तासांत शरीरावर आढळणारे कीटक आणि शरीराचे बरेचसे कुजणे झाल्यावर त्यावर आढळणारे कीटक हे विशिष्ट व वेगवेगळे असतात. शरीरावर असलेल्या माशीच्या प्रकारावरुन मृत्यूस किती वेळ होऊन गेला आहे याचा अंदाज येतो.
माश्यांचं आपलं एक जीवन चक्र असतं. प्रौढ मादा माशी अंडी घालते. त्यातून आळ्या बाहेर पडतात. आळ्या मोठ्या होऊन स्वतःभोवती कोश निर्माण करतात. कोषातून माशी बाहेर पडते. दुसर्या पिढीतील ही माशी पुन्हा अंडी घालते. असे जीवन चक्र सुरु राहते. या जीवन चक्रातील प्रत्येक प्रक्रियेला ठराविक वेळ लागतो.
मृत शरीरावर फक्त माश्या आहेत की त्यांची अंडी पण आहेत? अंडी आहेत की आळ्या पण दिसत आहेत? आळ्या असल्यास त्या लहान आहेत की वाढ झालेल्या आहेत? आळ्या कोशात जाण्याची स्थिती सुरू झाली आहे का? आळ्यांचे रिकामे कोश मृत शरीरावर दिसत आहेत का? या प्रश्नांचे उत्तर आपल्याला सांगू शकतात की मृत्यूला किती दिवस होऊन गेले आहेत.
माश्या येऊन अंडी घालतात. त्यातून आळ्या येतात. या आळ्या खाण्यासाठी इतर विशिष्ट किडे व कोळी येतात. अंडी खाणारे कीटक मृत्यूनंतर ठराविक कालावधी नंतरच दिसतात. तोंड नाक कान डोळे या उघड्या भागांमध्ये पाहिले किडे आपली वस्ती करतात. नंतर ते इतरत्र स्थलांतर करतात. शरीरावर कुठे किडे आढळतात यावरूनही मृत्यु होऊन किती वेळ झाला आहे ते कळते.
मृत्यू जर विष प्यायल्याने झाले असेल तर शरीर कुजल्या नंतर समजू शकत नाही. मात्र त्या शरीरावर पोसत असलेल्या आळ्यांमध्ये किंवा त्यांच्या विष्ठेमध्ये ते वीष सापडू शकते. शरीराचा नुसता सांगाडा उरला असतानाही विषबाधेचा पुरावा अश्याप्रकारे सापडू शकतो.
मृत देह सापडला तेथेच मृत्यू झाला की मृत्यू इतर ठिकाणी झाल्यानंतर देह स्थलांतरित करण्यात आले हे ही सांगण्यात कीटकांची मदत होते. काही कीटक हे शहरी भागातच सापडतात तर काही कीटक हे जंगल व वनप्रदेशातच सापडतात. मृत देह जंगलात, मात्र त्यावर शहर भागातील कीटक किंवा मृत देह शहर वस्तीत, मात्र त्यावर जंगलात आढळणार्या माश्यांचे अंडे अश्या संशयास्पद तफावतीमुळे गुन्ह्याचा उलगडा होऊ शकतो.
मृत शरीरावरील कीटकांचा अभ्यास व त्याचा गुन्हे अन्वेषण करण्यातील उपयोग हे शास्त्र नवीन नाही. तेराव्या शतकात चीन मध्ये सन त्सू याने त्यावर लिखाण केले आहे. फोरेन्सिक एनटेमोलॉजी हे एक आव्हानात्मक क्षेत्र आहे. जीवशास्त्राचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांना या विषयात प्राविण्य मिळविता येऊ शकते.