क्राइम सीन म्हणजे घटना स्थळ हे पुराव्याने भरलेले असते. काही अनपेक्षित व अनाकलनीय घटना अश्या घडतात की काहीच सुगावा लागत नाही. घटनेला कोणीही साक्षीदार नाही, गुन्हा कोणी केला असेल याचा जेव्हा काहीही अंदाज येत नाही किंवा कोणीही संशयित डोळ्यासमोर येत नाही तेव्हा investigative psychology चा उपयोग होतो.
Investigative psychology म्हणजे गुन्हे अन्वेषणाला सहाय्यक मानसशास्त्रीय अभ्यास असं आपण म्हणू शकतो.
गुन्हेगाराच्या गुन्हा करण्याच्या पध्दती वरुन त्याचं व्यक्तिमत्व व स्वभाव समजणे शक्य असते.
साक्षीदाराने गुन्हेगाराचे केलेल्या वर्णना प्रमाणे आर्टिस्ट संशयिताचे चित्रं काढतो आणि ओळख पटते. पण जेव्हा साक्षीदार नाही तेव्हा क्राइम सीन बघून संशयितांची व्यक्तिरेखा उभारणे हे काम मानसशास्त्रज्ञ करू शकतात.
खुनाच्या प्रकरणात घटना स्थळी बॉडी जर जशी च्या तशी टाकून गुन्हेगार निघून गेला असेल, घटना स्थळी उपलब्ध वस्तूनेच जर वार/खून केला असेल, झटापट झाल्याचे पुरावे दिसत असतील तर कदाचित रागाच्या भरात आवेषात खून झाला असेल. अशी व्यक्ति क्षणार्धात समतोल सोडून खून करून नंतर भानावर आली असावी. संशयित हा शीघ्रकोपी व खूप भावूक व्यक्ति असू शकतो.
मात्रं, खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला असेल, रक्ताचे डाग पुसले असतील, पाउल खुणा पुसल्या असतील, हत्यारांची विल्हेवाट लावली असेल, बोटांचे ठसे पुसले असतील तर गुन्हा थंड डोक्याने केलेला आहे. अशी व्यक्ति रोजच्या जीवनात नीट नेटकी व नियोजितपणे वागणारी असू शकते.
मृतदेहावर एकाच ठिकाणी अनेक वार केले असतील किंवा अनेक ठिकाणी वार केले असतील तर गुन्हेगाराचे व्यक्तिमत्व व भावना वेगवेगळ्या असतात.
Background behaviorr म्हणजे गुन्ह्या पूर्वीचं वागणं म्हणजे उदाहरण म्हणुन, दबा धरून बसणे, गुन्ह्यासाठी वातावरण अनुकूल करून ठेवणे, हत्यारांची तयारी असणे, इत्यादी व Post-offence behaviour गुन्ह्या नंतरचं वागणं म्हणजे उदाहरण म्हणुन, पुराव्यांची विल्हेवाट लावणे, तपास करणार्यांची दिशाभूल करण्यासाठी काहीतरी करणे, खून हा आत्महत्या असल्याचे भासवणे, या सगळ्या गोष्टी गुन्हेगाराचे व्यक्तिमत्व व स्वभाव समजण्यास उपयुक्त ठरतात.
मानसशास्त्रात व गुन्हे अन्वेषणामध्ये Investigative psychology अत्यंत नवीन प्रयोग आहे. प्रगत देशांत याला खूप वाव आहे. वेगळं करियर म्हणुन हा विषय अत्यंत आव्हानात्मक व रोमांचक आहे.